मेट्रो 3 च्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 च्या 33.5 किमी लांबीच्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 या ठिकाणी झाले. यावेळी कोस्टल रोड, सी लिंक, मेट्रो आदी प्रकल्पांमुळे येत्या 3 वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार असून एक आधुनिक शहर म्हणून पुढील काळात मुंबई पहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

मुंबई मेट्रो 3 पॅकेज 7 मधील 1.26 किमी इतके भुयारीकरण सोमावारी पूर्ण झाले. या भुयारीकरणाच्या कामाचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. मुंबईकरांच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये

> मुंबई शहराचा भूगर्भ बेसाल्ट, ब्रेशिया तसेच टुफ अशा प्रकारच्या कठीण खडकांचा असून त्यांना भेदत भुयारीकरण करूनन ‘वैनगंगा 1’ या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) काम केले आहे.

> वैनगंगा 1 या टनेल बोअरिंग मशीनने 259 दिवसात 1.26 किमीचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करून एक इतिहास रचला आहे.

> शांघाय टनेलिंग इंजिनीयरिंग कंपनीने हे टनेल बोअरिंग मशिन तयार केले आहे.

> हे टीबीएम 92 मी लांबीचे असून प्रतिदिन 4.6 मी इतक्या वेगाने भुयारीकरण करते.

> या मशीनने सध्या कार्यरत असलेली मेट्रो लाईन 1 आणि सहार उन्नत मार्ग यासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून भुयारीकरण केले आहे.

> 250 निष्णात अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगार यांनी सातत्यपूर्ण मेहनत घेतली

> मुंबई मेट्रो3 चे पॅकेज 7 मरोळ नाका येथे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 आणि जेव्हीएलआर येथे स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी मेट्रो 6 यांना जोडणार

> तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेने न जोडली गेलेली एमआयडीसी, सीप्झ यासारखी महत्वाची औद्योगिक आणि रोजगार केंद्रेही जोडली जाणार

> मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पूर्ण प्रकल्पातील सुमारे 9 किमी इतके भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

> 19,40,2544 क्यु मी इतक्या मातीचे उत्खनन

> पॅकेज 7 चे हे काम एल अँड टी आणि शांघाय इंजिनियरिंग कंपनी संयुक्त भागीदारीत करत आहेत

> पॅकेज 7 मधील भुयारीकरणचा हा टप्पा 7.07 किमी इतका असून त्यातून एकूण 11 लाख क्यू मी इतकी माती उत्खनित होणार.

> ही माती तळवली पिसे येथे निर्धारित शासकीय जागेत टाकली जाणार

> आतापर्यंत 2.5 लाख क्यु मी इतकी माती उत्खनित