कबुतराला खाऊ घातलं म्हणून मुंबईत पहिला गुन्हा दाखल

कबूतरखान्यात पक्ष्यांना कोणतेही खाद्य घालू नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही माहीम येथे एका व्यक्तीने त्याचे उल्लंघन केले. माहीमच्या एल जे मार्गावर एके ठिकाणी कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तीने कबूतरांना दाणे टाकले व तो निघून गेला. याबाबत पालिका कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यानंतर माहीम पोलिसांनी कबूतरांना दाणे घातले म्हणून गुन्हा नोंदवला आहे. अशाप्रकारे नोंद झालेला हा मुंबईतला पहिला गुन्हा आहे.

कबूतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याने शहरातील कबूतरखाने बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने पालिकेला दिले होते; मात्र पक्ष्यांवर हा अन्याय असून खाद्यांविना त्यांचा मृत्यू होण्याची भीती असल्याने कबूतरांना खाद्य घालण्यापासून रोखू नये, अशी मागणी करत पल्लवी पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनेक प्राणी व पक्षीमित्रांचीदेखील अशीच मागणी होती. याप्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर कबूतरखान्यात पक्ष्यांना कोणतेही खाद्य घालू नये असे उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले. शिवाय पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यासदेखील सांगितले होते. त्यानुसार माहीम पोलिसांनी कबूतरांना दाणे घालणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 223, 270, 271 बीएनएस अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

कारमधून आला, दाणे टाकले अन

शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका कारमधून एक व्यक्ती एल जे मार्गावर कबूतर असतात तिथे आली. त्याने कारमधून कबूतरांना दाणे टाकले आणि तो निघून गेला. हा प्रकार पाहिल्यानंतर पालिका कर्मचाऱ्याने माहीम पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

कारच्या नंबरवरून शोध सुरू

कबूतरांना दाणे टाकून सटकलेल्या व्यक्तीच्या कारचा नंबर पोलिसांना मिळाला आहे. पोलीस त्या कारच्या नंबरवरून कबूतरांना दाणे टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही गुन्हा दाखल केला असल्याचे माहीम पोलिसांनी सांगितले.