‘म्हाडा’च्या इतिहासात पहिलावहिला लोकशाही दिन सोमवारी पार पडला. सर्वसामान्यांनी थेट ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासमोर आपल्या तक्रारी मांडल्या. सर्व अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत जयस्वाल यांनी अर्जांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले. तसेच निवेदन अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल येत्या 15 दिवसांत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात पार पडलेल्या पहिल्या लोकशाही दिनासाठी 15 अर्ज प्राप्त झाले. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, नीलिमा धायगुडे यावेळी उपस्थित होते.
पहिल्याच लोकशाही दिनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सर्व अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या अर्जावर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना देण्यात आले. अर्जावर काय कार्यवाही केली याची माहिती लेखी स्वरुपात अर्जदारांना मिळणार आहे. यानिमित्ताने नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
असे होते तक्रारींचे स्वरूप
लोकशाही दिनासाठी आलेल्या 15 अर्जांपैकी 5 अर्ज मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे होते, तर 9 अर्ज मुंबई तर एक अर्ज पुणे मंडळाशी संबंधित होता. विकासकाने पुनर्विकासात फसवणूक केली, थकीत भाडे असे तक्रारीचे स्वरूप होते.
असा करा अर्ज
म्हाडातर्फे आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱया सोमवारी दुपारी 12 वाजता ‘लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. अर्जदाराने विहित नमुन्यासह 14 दिवस अगोदर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.