खेळापेक्षा नियमच कडक! कोरोनानंतर पहिल्यांदा होणार इंग्लंड – वेस्ट इंडीजमध्ये कसोटी लढत

1969

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका झालेली नाही. मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाच क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्यात येत आहे. यजमान इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यामध्ये येत्या बुधवारपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होईल. मात्र यावेळी दोन्ही संघांतील खेळाडूंची खेळासाठीच नव्हे तर नियमांचे पालन करण्यासाठीही ‘कसोटी’ लागणार आहे. क्रिकेटपटूंच्या सुरक्षेला यावेळी आयोजकांकडून प्राधान्य देण्यात आले आहे.

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी उभय संघांतील खेळाडूंसाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येकाने काही वेळेनंतर हॅण्ड सॅनीटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. हॉटेलमधील प्रत्येक पायऱ्यांवर ‘ऍरो’ दाखवण्यात आले आहेत. खेळाडूंना हे ‘ऍरो’ त्यांच्या प्रत्येक मार्गाची दिशा दाखवणार आहेत. एखाद्या ‘सायफाय’ सिनेमासारख्या या सर्व गोष्टी आहेत, असे इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूड यावेळी म्हणाला. या मालिकेत गोलंदाजांना चेंडूला आपली ‘लाळ’ किंका ‘थुंकी’ लावता येणार नाही.

संक्रमित कपडय़ाने चेंडू साफ करणार

ग्रेटब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी चेंडूमुळे कोरोनाच्या संक्रमणाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. मात्र इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन व स्वीडनमधील कारोलिंस्का इन्स्टिटय़ूटच्या रिपोर्टद्वारे चेंडूमुळे कोरोनाचे संक्रमण होणार नाही असे सांगण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार चेंडूला संक्रमीत कपडय़ाने साफ केल्यानंतर 30 सेंकदांनंतरही चेंडूवर व्हायरस मिळणार नाही.

जो डेन्लीची यजमान संघात एण्ट्री

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची निवड करण्यात आली असून यामध्ये फलंदाज जो डेन्लीला स्थान देण्यात आले आहे. जॉनी बेअरस्टॉ व मोईन अली यांना बाहेरच ठेवण्यात आले आहे. फिरकीपटू डोम बेसचीही संघात एण्ट्री करण्यात आली आहे. जो रूटच्या अनुपस्थितीत बेन स्टोक्सच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या