शाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी आता लोकशाही दिनाच्या धर्तीवर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्यात येणार आहे. या तक्रारींच्या निराकरणासाठी शाळा, जिल्हा व विभागीय स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
सध्या शाळेतील असुविधांपासून ते विविध प्रशासकीय कामांबाबत तक्रार निवारणासाठी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे अनेकदा ग्रामीण भागांतील शाळांना शहरात येऊन तक्रारी कराव्या लागतात. याचबरोबर अनेकदा या तक्रारींचा निपटाराही होत नसल्यामुळे अनेक समस्या वेळेत सोडवल्या जात नव्हत्या. या तक्रारी भविष्यात वेळेवर सोडवल्या जाव्यात यासाठी तक्रार पेटीची योजना आखण्यात आली आहे. शाळा स्तरावर मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा समावेश असलेली तक्रार निवारण समिती असेल. यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींचे, शिक्षकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, कोणत्याही प्रकारचे शोषण, शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचे तातडीने निराकारण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर संस्थाचालकही यात संस्थात्मक कादाबाबतच्या तक्रारी करू शकणार आहेत.
जिल्हा स्तरावर समिती
जिल्हा स्तरावर तक्रार निकारण समिती असून यात जिल्हा शिक्षण अधिकारी/ शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी कार्यरत असतील. तसेच विभागीय स्तरावर उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक, शाळा व संस्था यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळांचे अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण उपनिरीक्षक यांची एक समिती असणार आहे.


























































