बुद्धिबळ वर्ल्ड कपमध्ये चौकार; प्रथमच अंतिम आठमध्ये चार हिंदुस्थानी

बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच चार हिंदुस्थानी बुद्धिबळपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. ग्रॅण्डमास्टर गुजरातीने दुसऱयांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. आता तो अझरबैजानच्या निजात अॅबासोव्हची भिडेल. सर्वात विशेष म्हणजे ‘बुद्धिबळाची पॉवरहाऊस’ मानल्या जाणाऱया रशियाचा एकही खेळाडू अंतिम आठमध्ये नाही आणि हिंदुस्थानचे चार खेळाडू उपांत्यपूर्व सामना खेळणार आहेत.

आजचा दिवस हिंदुस्थानी बुद्धिबळपटूंनी गाजवला. सर्वच खेळाडूंनी उच्चस्तरीय खेळ केला. त्यात विदित गुजरातीची कामगिरी उल्लेखनीय होती. त्याने रशियच्या यान नेपोंनिशीचा पराभव करत हिंदुस्थानींना स्वातंत्र्यदिनाची जबरदस्त भेट दिली. नेपोंनिशीने जगज्जेत्या डिंग लीरेनला झुंजवले होते, पण गुजरातीसमोर त्याचा संघर्ष कमी पडला. टायब्रेकरच्या दोन्ही डावांत त्याने 2-0 ने विजय मिळविला. त्यांचे दोन्ही क्लासिकल डाव बरोबरीत सुटले होते. हा विदितच्या कारकीर्दीत सर्वोत्तम विजय मानला जात आहे. याआधी आर प्रज्ञानंदा, अर्जुन एरीगेसी आणि डी. मुकेश उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले होते. गुजरातीनेही धडक मारल्यामुळे बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच चार हिंदुस्थानी उपांत्य पूर्व फेरीत खेळतील. या पराक्रमामुळे हिंदुस्थानची बुद्धिबळातील चातुर्य अवघ्या जगाला पाहायला मिळाले आहे.

हिंदुस्थानींची जोरदार कामगिरी

हिंदुस्थानच्या बुद्धिबळपटूंनी संस्मरणीय कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रज्ञानंदाने जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला संघर्षपूर्ण लढतीत नमवले तर अर्जुनने सिंदारोव्हविरुद्ध भन्नाट प्रदर्शन केला. मुकेशने काळय़ा मोहऱयानिशी खेळताना चीनच्या वांग हाओला पराभूत केले. आता मुकेश रविवारी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस नार्मनशी पंगा घेणार आहे तर प्रज्ञानंदा आणि अर्जुन अॅरीगसी एकमेकांशी भिडतील. चौथा उपांत्यपूर्व सामना अमेरिकेच्या फॅबियाने करूआना आणि आपल्याच देशाच्या दोमिंगेज पेरेजशी सामना करील.