
कोरोनामध्ये शाळेत प्रवेश घेतलेले आणि ऑनलाइन वर्गांना हजेरी लावणारे विद्यार्थी यंदा प्रथमच शालेय सहलींची मजा लुटणार आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा राज्यातील सर्व शाळा जूनपासून पूर्ववत सुरू झाल्या. आता थंडीची चाहूल लागताच शाळांना सहलींचे वेध लागले असून शालेय शिक्षण विभागानेही सहलींचे आयोजन करण्यास हिरवा पंदील दिला आहे. मात्र त्यासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांची परवानगी आवश्यक असून पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोरोनामुळे घरातूनच अभ्यास करणारे विद्यार्थी सहलीला मुकले होते. गेल्या वर्षी ऑफलाइन शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्यांना उशीर झाल्याने शिक्षण विभागाने शाळांना सहलीची परवानगी दिली नव्हती. यंदा मात्र शाळा जोमाने सहलीसाठीची तयारी करीत आहेत. मुंबईतील काही खासगी शाळांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सहलीचे आयोजन केले आहे. याच महिन्यात शाळेत क्रीडा स्पर्धा, वार्षिक महोत्सवाचे आयोजनही करण्यात येते. कोरोनाकाळात शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी यंदा पहिल्यांदाच सहलीला जाणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सहलीत अपघात झाल्यास मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदार राहणार आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणीच सहल काढावी, यांसारख्या अटी घालण्यात आल्या आहेत. सरकारी निर्णयात शाळांनी सहलीसाठी एसटीलाच प्राधान्य द्यावे हा नियम आहे. मात्र, खासगी शाळांचा स्वतःच्या स्कूल बस सहलीसाठी वापरण्याचा आग्रह आहे. सहलीसाठी स्कूल बसची परवानगी मिळणार नाही; म्हणून काही खासगी शाळांनी विनापरवानगीच सहली काढल्या आहेत. अशा सहलींची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची आहे.
महेंद्र गणपुले, राज्य प्रवत्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ
सहलीसाठी विद्यार्थ्यांचा विमा काढावा
सहलीला येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विमा काढण्यात यावा, अशी सूचना शिक्षण विभागाने शाळांना केली आहे. तसेच सहल निघण्यापूर्वी किमान 15 दिवस आधी सहल परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सहलीत विद्यार्थिनी असल्यास महिला शिक्षकांची नेमणूक करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची असेल. तसेच विद्यार्थ्यांवर सहलीला येण्यासाठी सक्ती करू नये, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
सहल नेणाऱ्या शाळांसाठी अन्य सूचना
समुद्रकिनारे, नदी, उंच टेकडीच्या ठिकाणी सहल नेताना काळजी घ्यावी. गड, किल्ले दाखवावेत.
एसटी बसमधूनच सहल नेण्यात यावी.
वीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असावे.
शिक्षकांनी तंबाखू, गुटखा तसेच अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये.
माध्यमिक विभागाची सहल राज्याबाहेर नेण्यास हरकत नाही.

























































