
देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन आता धावण्यासाठी तयार आहे. ही ट्रेन डिसेंबरच्या अखेरपर्यंत धावताना दिसणार आहे. पटना ते दिल्ली अशी ट्रेन धावणार आहे. या ट्रेनमध्ये तेजस एक्स्प्रेससारखा वेग, राजधानी एक्स्प्रेससारखी सुविधा आणि वंदे भारतचा हायटेक अनुभव प्रवाशांना मिळणार आहे.
रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथील बीईएमएल कारखान्यात या ट्रेनचे दोन रॅक तयार करण्यात आले आहेत. पहिला रॅक फिनिशिंगच्या अखेरच्या टप्प्यात आहे. याला 12 डिसेंबरला उत्तर रेल्वेसाठी बंगळुरूहून रवाना केले जाईल. यानंतर दिल्ली ते पटणा मार्गावर ट्रायल घेतली जाईल. त्यानंतर याच मार्गावर देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन धावणार आहे. या आधुनिक ट्रेनमध्ये एकूण 16 कोच असतील. ज्यात 827 प्रवासी स्लिपरने सुखाचा प्रवास करू शकतील. सिटिंग आणि स्लिपिंगची व्यवस्था थर्ड एसी डब्यात 611, सेकंड एसी डब्यात 188 आणि फर्स्ट एसी डब्यात 24 सीट देण्यात आले आहेत. आगामी काळात या ट्रेनच्या कोचची संख्या वाढून 16 ऐवजी 24 केली जाणार आहे. ही ट्रेन आठवडय़ाला सहा दिवस धावणार आहे. पटणाच्या राजेंद्र नगरहून सायंकाळी सहाला ही ट्रेन सुटेल आणि दुसऱया दिवशी सकाळी दिल्ली टर्मिनसला पोहोचेल.
वंदे भारत स्लीपरमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षा मिळेल. या ट्रेनमध्ये ऑटोमेटिक दरवाजे, बायो टॉयलेट, सीसीटीव्ही कॅमेरे, पर्सनल रीडिंग लाइट्स आणि प्रीमियम क्वॉलिटीची आरामदायक इंटिरियर उपलब्ध केली जाईल. या ट्रेनमध्ये कवच सिस्टम आणि क्रॅश-प्रूफसारखी यंत्रणा बसवली आहे.



























































