
मतचोरीच्या आरोपांवर उत्तरे देण्याऐवजी राहुल गांधी यांना दमदाटी करणाऱया निवडणूक आयोगाला आज विरोधकांनी घेरले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भाजपचे नवे प्रवत्ते बनले असून त्यांनी विरोधी पक्षांविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप इंडिया आघाडीने संयुक्त पत्रकार परिषदेत केला. राहुल गांधी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागणाऱ्या आयोगाने आधी मतदार यादीत घोळ नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे, मगच आम्ही प्रतिज्ञापत्रासह आरोप करू, असे काँग्रेसने सुनावले. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणण्याचे संकेतही इंडिया आघाडीने दिले.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज दिल्लीतील कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी 8 प्रमुख नेत्यांनी भूमिका मांडत निवडणूक आयोगाच्या कालच्या पत्रकार परिषदेची चिरफाड केली. ज्ञानेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. बिहारमध्ये 65 लाख मतदारांची नावे का वगळली याची माहिती सुप्रीम कोर्टाने मागवली आहे. त्यावरही ज्ञानेश कुमार काही बोलले नाहीत, याकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लक्ष वेधले. पत्रकार परिषदेनंतर 20 पक्षांच्या स्वाक्षरीने एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले.
आयोग घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी – गौरव गोगोई
‘घटनेने दिलेल्या मताच्या अधिकारावर लोकशाहीची इमारत उभी असते. तिचे रक्षण करणे हे आयोगाचे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, हे कर्तव्य आयोग पार पाडताना दिसत नाही. विरोधकांच्या प्रश्नाची उत्तरे देण्याऐवजी आयोग जबाबदारीपासून पळ काढत आहे. उलट विरोधी पक्षांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाब्दिक हल्ले केले. निवडणूक आयोग हा एका पक्षाची बाजू घेणाया अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे हे आता सिद्ध झाले आहे. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही त्यांच्या कारभारावर नजर ठेवू आणि आवश्यक ती पावलं उचलू, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले.
लोकसभा बरखास्त करा – महुआ मोईत्रा
बिहारमधील 22 लाख मृत मतदारांच्या मुद्दय़ावरून तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांनी आयोगाचा समाचार घेतला. ‘मागच्या 20 वर्षांपासूनचे हे मृत मतदार यादीत कसे? या सदोष यादीबद्दल माजी निवडणूक आयुक्तांवर कारवाई करायला हवी व लोकसभा तत्काळ बरखास्त करायला हवी, अशी मागणी मोईत्रा यांनी केली.
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा अधिकार नाही! – जॉन ब्रिटास
मतदार फेरतपासणी हा कटच असून यावर संसदेत चर्चा का होऊ दिली जात नाही, असा सवाल डीएमकेचे खासदार थिरुची शिवा यांनी केला. ज्ञानेश कुमार यांनी आयुक्तपदी राहण्याचा अधिकार गमावला आहे, असा संताप माकपचे जॉन ब्रिटास यांनी व्यक्त केला.
आमच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर का नाही? – रामगोपाल यादव
उत्तर प्रदेशात 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी सुमारे 18 हजार मतदारांची नावे वगळली होती. त्याविषयीची प्रतिज्ञापत्रे समाजवादी पक्षाने आयोगाला दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही, असा आरोप सपाचे रामगोपाल यादव यांनी केला. अखिलेश यादव यांनी आज संसदेच्या आवारात या प्रतिज्ञापत्रांच्या प्रती व त्यावर आलेली पोचपावती दाखवून आयोगाला उघडे पाडले.
भेदभाव करत नाही मग आमचा पक्ष दुसऱयांना कसा दिला? – अरविंद सावंत
आम्ही सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये भेदभाव करत नाही असे सांगणाऱया निवडणूक आयोगाचा शिवसेना नेत, खासदार अरविंद सावंत यांनी खरपूस समाचार घेतला. ‘फक्त आमदार सोडून गेले म्हणून पक्षाचे नाव आणि चिन्ह दुसऱयांना देऊन टाकले. आम्ही प्रतिज्ञापत्रावर पक्षाचे सदस्य व पदाधिकाऱयांचे आकडे दिले. समोरच्यांनी तेही दिले नाही. तरीही आमचा पक्ष व चिन्ह त्यांना दिला. कोणाच्या इशाऱयावर दिला? हा पक्षपात नाही का?,’ असा सवाल सावंत यांनी केला.
एसआयआरवरून संसदेत पुन्हा गदारोळ
बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरपडताळणीच्या मुद्दय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज पुन्हा गदारोळ झाला. लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही कामकाजात सातत्याने अडथळे येत होते. सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी सभागृहातील गोंधळासाठी विरोधकांना जबाबदार धरले. पहिल्या दिवसापासूनच विरोधक बेजबाबदारपणे वागत आहेत. जनतेचा पैसा वाया जातोय, देश पाहतोय, असे नड्डा म्हणाले. त्यामुळे गदारोळ वाढला आणि विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने महत्त्वाची विधेयके उरकून घेतली.
ज्ञानेश नव्हे हे तर अज्ञानेश कुमार
आपचे संजय सिंह म्हणाले, निवडणूक आयुक्तांनी काल अज्ञानीपणाचे प्रदर्शन केले. त्यांचे नाव ज्ञानेश कुमार ऐवजी अज्ञानेश कुमार असायला हवे, असा टोला त्यांनी हाणला. वृत्तवाहिन्यांवर महिला मतदान करण्यासाठी रांगेत उभ्या असल्याचे दाखवले जाते तेव्हा गोपनीयतेचे उल्लंघन होत नाही का, असा सवालही त्यांनी केला.
काल भाजपला एक नवा प्रवक्ता मिळाला?
निवडणूक आयोग हा एका पक्षाची बाजू घेणाऱ्या अधिकाऱयांच्या ताब्यात आहे हे आता सिद्ध झाले आहे. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही त्यांच्या कारभारावर नजर ठेवू आणि आवश्यक ती पावलं उचलू, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले. निवडणूक आयोगाने काल विरोधकांच्या एकाही आरोपांवर स्पष्टीकरण किंवा उत्तर दिले नाही. ते कोणाच्या तरी इशाऱयावरून कोणाची तरी भूमिका मांडत होते. काल आम्ही नव्या निवडणूक आयुक्तांना शोधत होतो, ते तर मिळाले नाहीत, भाजपला एक नवा प्रवक्ता मिळाला, असा टोला राजदचे खासदार मनोज झा यांनी हाणला. राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेची सुरुवात रविवारी झाली. ती यात्रा झाकोळली जावी म्हणूनच आयोगाने पत्रकार परिषदेसाठी रविवारचा दिवस निवडला, असा आरोपही त्यांनी केला.
महाभियोग मंजूर होऊ शकतो का?
संसदेत असा महाभियोग आणता येतो. तो दोन-तृतीयांश मतांनी मंजूर व्हावा लागतो. हा ठराव सभापतींनी स्वीकारण्यासाठी त्यावर किमान 50 सदस्यांची स्वाक्षरी असावी लागते. महाभियोग मंजूर करून घेण्याइतपत संख्या विरोधी पक्षांकडे नाही. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील रोष व्यक्त करण्याचा हा एक मार्ग असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
खरगे यांच्या घरी महत्त्वपूर्ण बैठक
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठकही झाली. या बैठकीत उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्यासोबतच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सादर करण्याबाबतही विचारविनिमय झाल्याचे समजते.