
बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारी व परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर यांचा धुमाकूळ यामुळे त्रस्त असलेल्या पारंपरिक मच्छीमारांचा आवाज बनून अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्ग तर्फे 12 मार्चपासून सहाय्यक मस्य आयुक्त कार्यालय येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. सहा दिवस उपोषण सुरू आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्याने उपोषकर्त्या मच्छीमारांनी आंदोलन तीव्र केले असून मच्छिमार व मच्छी विक्रेते, सागरी पर्यटन व्यवसायिक यांचा पाठिंबा त्यांना मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मासेमारी बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. तसेच मासे लिलाव, खरेदी विक्री बंद ठेवण्यात आली आहे. मासे लिलावसाठी सकाळी 6 वाजल्यापासून गजबजून निघणारा मच्छीमार्केट लगतच किनाऱ्यावरील परिसर शांत होता. तर मच्छीमार्केटही पूर्णपणे बंद होते. मासे खरेदीस आलेले ग्राहक माघारी परतले.
एकूणच 100 टक्के बंद मधून मच्छीमार एकजूट दिसून आली. मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनीही या बंदला।पाठिंबा देत आपले सागरी पर्यटन व्यवसाय बंद ठेवले आहेत. आमचे आंदोलन शांततेच्या व लोकशाही मार्गाने सुरू आहे. मात्र आंदोलनाची दखल मत्स्य विभाग शासन-प्रशासन घेत नसेल तर आंदोलन तीव्र झाल्यास त्याला संबंधित यंत्रणा जबाबदार असेल असे उपोषणकर्ते मिथुन मालंडकर यांनी सांगितले.




























































