मालवणात नौका उलटून बेपत्ता झालेल्या मच्छीमाराचा मृतदेह सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवणात सर्जेकोट खाडीपात्रात मासेमारीसाठी गेल्यानंतर नौका उलटून पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या दिवाकर जानू देऊलकर (वय 26) या मच्छीमाराचा मृतदेह रविवारी सकाळी तोंडवळी किनारपट्टीवर सापडला. शोकाकुल वातावरणात दिवाकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवाकर यांच्या पश्चात आई, दोन भाऊ व अन्य नातेवाईक असा परिवार आहे.

सर्जेकोट खाडीपात्रात शनिवारी सकाळी मासेमारीसाठी गेलेली नौका पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन समुद्राच्या मुखाजवळ (संगम) उलटली. नौकेतील चार मच्छीमार पाण्यात फेकले गेले. त्यांना वाचवण्यास गेलेली दुसरी नौकाही लाटांच्या तडाख्यामुळे बुडाली होती. दोन्ही नौकेवरील आठ ते दहा मच्छीमारांनी तासभर पोहत किनारा गाठला. अत्यवस्थ वातच असलेल्या दोन मच्छीमारांच्या प्रकृतीत उपचारानंतर सुधारणा झाली. या दुर्घटनेत दिवाकर जानू देऊलकर (वय 26, रा. सर्जेकोट) हा मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला होता. दिवसभर शोधकार्य सुरू होते. रविवारी सकाळी तोंडवळी-तळाशील समुद्रकिनारी लाटांबरोबर वाहून आलेला दिवाकर यांचा मृतदेह स्थानिकांना दिसला. दिवाकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.