निसर्गसंपन्न कांदळगावाच्या पठारावर मत्स्यबीज वाढीचा प्रकल्प

256

मालवण येथील निसर्गसंपन्न कांदळगावात गोड्या पाण्यातील मत्स्यबीज वाढीचा प्रकल्प साकारण्यात येत आहे. पठारावरील खोलगट कातळ जागेत पाणी साचून निर्माण होणाऱ्या हंगामी तलावात होणारा हा प्रकल्प कोकणातील पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा करण्यात आला आहे.

निलक्रांती विविध कृषि मत्स्य, पर्यटन व पत सेवा सहकारी संस्था मालवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा मुळदे येथील गोड्या पाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्प याच्या संयुक्त विद्यमाने कांदळगाव येथील प्रगतशील शेतकरी भुषण सुर्वे यांच्या जागेतील हंगामी तलावात कटला आणि रोहू जातीच्या मत्स्यबीजाचे मत्स्य बोटुकली आकारांपर्यंत वाढीच्या प्रायोगिक चाचणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आला. कोकणातील हा पहिलाच उपक्रम असून हा उपक्रम यशस्वी झाल्यास अनेक शेतकरी यातून प्रेरणा घेऊन उन्नती साधतील. असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी व्यक्त केला. तर ही कांदळगावच्या नव्या विकासाची नांदी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ही प्रायोगीक चाचणी मुळदे मत्स्यप्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत आणि सहकारी याच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे सरासरी 3500 मि. मी. एवढा पाऊस पडतो. या पावसाच्या पाण्याचे अनेक भागात हंगामी तलाव तयार होतात. परंतु या तलावाच्या पाण्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग केला जात नाही. उन्हाळ्यापर्यंत काही तलाव आटतात तर काही तळ गाठतात. जिल्ह्यात सुमारे 25 लघुपाटबंधारे तलाव, 2 मध्यम पाटबंधारे तलाव असून या खाली सुमारे 1000 हेक्टर एवढे जलक्षेत्र आहे. तसेच जिल्ह्यात शासनाच्या शेततळी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेततलाव तयार झालेले आहेत. या तलावात बारमाही मत्स्यसंवर्धनास वाव आहे. परंतु जिल्ह्यात यापूर्वी मत्स्यबीज निर्मिती होत नसल्याने या पाणी साठ्याचा योग्य वापर होत नव्हता. पर्यायाने येथील गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन नगण्य आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मुळदे येथील मत्स्यशेती प्रकल्पाअंतर्गत नुकतेच मत्स्यबीज निर्मिती केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेले असून यातून मोठ्या प्रमाणावर मस्त्यबीज तयार केले जाते. परंतु बीजाला योग्य आकारापर्यंत वाढविण्याच्या सुविधा येथे पुरेशा प्रमाणात नसल्याने शेतकऱ्याला मोठ्या आकाराचे बीज तलावात साठवणूकी करीता उपलब्ध होत नाही. जिल्ह्यात पावसाळी हंगामात तयार होणाऱ्या तलावात सदरचे बीज वाढवून शेतकऱ्यास फायदेशीर होवू शकेल का याची पडताळणी करण्याकरीता कोकण प्रांतात प्रथमच कातळावरील पावसाची हंगामी तलावात भारतीय प्रमुख कार्प मासळीच्या बीजाची बोटुकली आकारापर्यंत वाढ तपासण्याकरीता प्रक्षेत्र चाचणी कांदळगाव येथील भुषण सुर्वे यांच्या जागेतील तलावात घेण्यात येत आहे. या चाचणीकरीता निलक्रांती सहकारी संस्थेचे समन्वयक रविकिरण तोरसकर यांनी पुढाकार घेवून नियोजन केलेले आहे. मुळदे येथील मत्स्यबीज केंद्रात तयार करण्यात आलेले सुमारे 30 हजार नग मत्स्यबीज या तलावात जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडण्यात आले.

सुमारे 30 ते 35 दिवसांच्या कालावधीनंतर या बीजाची वाढ आणि जगण्याचे प्रमाण तपासण्यात येणार आहे. सदरची चाचणी यशस्वी झाल्यास पुढील वर्षापासून जिल्ह्याच्या इतर भागातील हंगामी तलावात अशा प्रकारचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्याचा विचार करण्यात येईल असे यावेळी मुळदे मत्स्यप्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत व रविकिरण तोरसकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत कांदळगाव येथील वातवरण व पाणी मत्स्यबीजाच्या वाढीकरिता पोषक असल्याने हा उपक्रम निश्चित यशस्वी होईल असे सांगितले. तसेच या उपक्रमातून इतर शेतकरी प्रेरणा घेऊन तेही असे उपक्रम राबवून चांगला फायदा मिळवू शकतील असेही डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या