घरचा फिटनेस

324

>> वरद चव्हाण

अमोघ चंदन. आनुवंशिक सडसडीतपणा… तरीही व्यायाम आणि आहार यावर सहजतेने बारीक लक्ष.

नमस्कार फिटनेस फ्रिक्स! माझ्या जवळ जवळ प्रत्येक लेखात मी गोष्ट प्रामुख्याने सांगत आलोय आणि ती म्हणजे एक सगळय़ांना व्यायामशाळेत जाऊन बेडक्या फुगवायची किंवा इंटेन्स कार्डिओ वर्कआऊटची गरज नसते. व्यायाम हा सौम्य रूपात पण होऊ शकतो आणि त्याचे परिणामसुद्धा चांगले असतात.

व्यायाम हा घरच्या घरी किंवा चालणं, सायकल चालवणं किंवा घरीच योगा करणं या स्वरूपाचासुद्धा असू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एरवी प्रत्येक सेलिब्रिटींचे 2-3 व्यायाम, कडक आहाराबद्दल उल्लेख करणाऱया वरदची भाषा कशी काय बदलली? अहो, कारण आपल्या आजच्या सेलिब्रिटीचं हेच तर वैशिष्टय़ आहे. यू.एस.पी. म्हणा ना! आपला आजचा सेलिब्रिटी आहे ‘अमोघ चंदन.’ अमोघने आजपर्यंत कधीच नियमितपणे व्यायामशाळेत जाऊन व्यायाम केला नाही. हो, पण दरवर्षी मुलुंड व ठाणे येथील व्यायामशाळांना देणगी देण्याचे काम मात्र अमोघ न चुकता करतो. म्हणजे व्यायामशाळेची मेंबरशिप घेतो, पण काही दिवसांनी तिथे जाण्याचा कंटाळासुद्धा करतो.

आहाराचं म्हणाल तर विशेष आहार असा काहीच पाळत नाही. आवडेल ते खातो, पण अमोघवर लेख लिहिण्याचे कारण म्हणजे आताच्या काळात या गोष्टी फिटनेसच्या संदर्भात बसत नसल्या तरी खाण्याची मौज करूनसुद्धा अमोघ सडसडीत आणि फिट आहे. आणि अमोघचं फिट असण्याचे कारण म्हणजे तो घरी करीत असलेला व्यायाम. अमोघ आणि माझी भेट ‘ललित 205’ या मालिकेमुळे झाली. खरं सांगायचे झाले तर ‘ललित 205’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांच्या शूटिंगच्या वेळी मी खाण्यापिण्याची खूप मौज केली. आम्हा कलाकारांची भट्टी इतकी चांगली जमली होती की सेटवर पिझ्झा, खिमा चिकन, चिकन करी, रसमलाई, चायनिज, सामोसे असे अन्य पदार्थ अगदी आठवड्यातून एक दोनवेळा तरी नक्कीच मागवले जात असत. अर्थात पोटभर खाऊन झाल्यावर आता बाहेरचं खाणं न खाणे, व्यायामाकडे लक्ष देणे, पोट सुटणार नाही याची काळजी घेणे अशा अनेक गोष्टी आम्ही पुरुष मंडळी करायचो.

आमच्या रूममध्ये डम्बेल्स व रेजिस्टन्स बॅण्ड असायचा. संध्याकाळी आम्ही सगळे न चुकता थोडाफार व्यायाम करायचो. जशी मैत्री वाढत गेली तसा अमोघचा फिटनेस फंडा लक्षात येत गेला. अमोघचं बारीक असणं हे बऱयापैकी हेरीडाएटरी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अभिनयाची आवड साधारण कॉलेजपासून लागली. पण अभिनेता होऊ असं अमोघला अजूनही वाटत नव्हतं. 2013 पर्यंत अमोघ जॉबसाठी इंटरह्यूज देत राहिला. पण कुठेतरी अभिनय क्षेत्रात यायला जास्त रस वाटत होता हे आमच्या वहिनीच्या म्हणजेच अमोघची पत्नी रुची साठे यांच्या लक्षात आलं. रुची स्वतः कंपनी सेक्रेटरी आहे. पत्नीच्या संपूर्ण पाठिंब्यामुळेच अमोघने अभिनय क्षेत्रात यायचं ठरवलं.

2013 मध्येच ‘लक्ष्य’ या मालिकेत त्याने पदार्पण केलं. तेव्हापासून आजपर्यंत अमोघ व्यायामशाळेत जरी नियमितपणे जात नसला तरी रोज सकाळी उठून 45 मिनिटे चालणं, 50 पुशअप्स, 50 सूर्यनमस्कार हे तो आवर्जून करतो. एका अभिनेत्याने मस्क्युलर असण्यापेक्षा बारीक – लीन राहणं अत्यंत गरजेचं आहे असं त्याला वाटतं. पण कुठल्या एका रोलसाठी त्याला बॉडी कमावून स्वतःच लुक चेंज करायला नक्की आवडेल. आहाराच्या बाबतीतसुद्धा अमोघला असं वाटतं की या वयात आपण सगळं पचवू शकतो. आपल्या खाण्यावर कोणतीही बंधने नसतात. तेव्हा आयुष्य एन्जॉय करावे. खाण्याच्या बाबतीत अमोघची आजी म्हणायची की, ज्याचा स्वतःच्या जीभेवर ताबा असतो तो जास्त आयुष्य जगतो. या लेखामधून तुम्हाला एका गोष्टीचा अंदाज आलाच असेल की बारीक व फ्रेश दिसण्यासाठी तुम्हाला दोन-तीन तास व्यायाम व डाएटची गरज नाही. सूर्यनमस्कार मारून आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. मग 10 सूर्यनमस्कार मारले तरी उत्तम, पण न विसरता रोज जो कुठला व्यायाम तुम्हाला आवडत असेल तो न चुकता करावा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या