रोबो डॉग, स्मार्ट बॉल अन् एआयची कमाल; फिफा वर्ल्ड कपमध्ये तंत्रज्ञानाचे पाच भन्नाट प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉलच्या मैदानावरील प्रत्येक निर्णय अधिक अचूक, अधिक जलद आणि अधिक पारदर्शक करण्यासाठी फिफाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शस्त्रसाठे मैदानात उतरवले आहेत. यंदाचा वर्ल्ड कप केवळ गोल, ड्रिबलिंग आणि ट्रॉफीसाठी लक्षात राहणार नाही; तो फुटबॉलच्या डिजिटल क्रांतीसाठीही इतिहासात कोरला जाणार आहे. विश्वातील सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवांपैकी एक असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये एक-दोन नव्हे, तर पाच भन्नाट प्रयोग केले जाणार आहेत. त्यामुळे हा वर्ल्ड कप फुटबॉलची क्रांतीही ठरणार आहे.

अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेली यंदाची स्पर्धा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल 48 संघ, तीन देशांचे संयुक्त यजमानपद आणि 39 दिवस चालणारा महासंग्राम; पण या सर्वांवर भारी पडत आहे एक वेगळीच गोष्ट म्हणजे, तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व शिरकाव.

दंगेखोरांवर ‘रोबो डॉग’ची करडी नजर

स्टेडियमबाहेर आणि परिसरात सुरक्षेची जबाबदारी आता फक्त पोलिसांवर नाही. त्यांना साथ देणार आहेत अत्याधुनिक ‘रोबो डॉग’. मेक्सिकोमधील सुरक्षा यंत्रणांनी लाखो डॉलर्स खर्च करून हे यांत्रिक श्वान तैनात केले आहेत. एखादी दंगल, गोंधळ किंवा संशयास्पद हालचाल आढळताच हे रोबो डॉग थेट घटनास्थळी धाव घेतील आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाला थेट व्हिडीओ फीड पाठवतील. म्हणजेच, मैदानाबाहेरील सुरक्षेची पहिली फळी आता माणूस नव्हे, तर मशीन असणार आहे.

एआय बनवणार खेळाडूंचा डिजिटल अवतार

कृत्रिम बुद्धिमत्ता आता फुटबॉलच्या मैदानातही उतरली आहे. प्रत्येक खेळाडूच्या शरीराचा सविस्तर डिजिटल स्कॅन करून त्याचा त्रिमितीय अवतार तयार केला जाणार आहे. या ‘थ्रीडी प्लेअर अवतार’ प्रणालीमुळे खेळाडूची स्थिती, हालचाल, हस्तक्षेप किंवा ऑफसाइडची शक्यता अत्यंत अचूकपणे मोजता येणार आहे. मानवी डोळ्यांना जे दिसत नाही, ते एआय काही सेकंदांत शोधून काढणार आहे.

रेफरीच्या डोळ्यांतून पाहता येणार सामना

यंदा प्रेक्षकांना मैदानातील थरार अगदी वेगळ्या नजरेतून अनुभवता येणार आहे. विश्वचषकातील सर्व 104 सामन्यांत रेफरी बॉडी कॅमेरे वापरणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना रेफरी जे पाहतो, तेच प्रत्यक्ष पाहता येणार आहे. खेळाडूंची धावपळ, वाद, फाऊल्स आणि मैदानावरील क्षणाक्षणाचे नाट्य अधिक जिवंतपणे अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

फुटबॉलच्या भविष्याचा ट्रेलर

एकेकाळी रेफरीची शिट्टी आणि लाईनमनचा झेंडा एवढ्यापुरता मर्यादित असलेला फुटबॉल आता एआय, सेन्सर्स, थ्रीडी मॉडेलिंग आणि रोबोटिक्सच्या युगात प्रवेश करत आहे. यंदाचा फिफा विश्वचषक केवळ जगातील सर्वोत्तम संघ ठरवणार नाही; तो क्रीडा आणि तंत्रज्ञान यांचा संगम किती विलक्षण असू शकतो याचाही प्रत्यय देणार आहे. मैदानावर मेस्सी, एम्बाप्पे, विनिसियस किंवा बेलिंगहॅमसारखे सुपरस्टार झळकतीलच; पण पडद्यामागे खरी कमाल असेल ती कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट सेन्सर्स आणि रोबोटिक्सची.

‘स्मार्ट बॉल’ सांगणार चेंडूची प्रत्येक गोष्ट

फुटबॉल चाहत्यांच्या नजरेला चेंडू फक्त गोल दिसतो. पण यंदाच्या विश्वचषकातील अधिकृत ‘ट्रायोंडा’ चेंडूच्या आत एक संपूर्ण तांत्रिक प्रयोगशाळाच दडलेली आहे. या चेंडूत बसवलेला ‘इनर्शियल मेजरमेंट युनिट’ (आयएमयू) सेन्सर दर सेकंदाला तब्बल 500 वेळा डेटा पाठवणार आहे. चेंडू कोणत्या वेगाने गेला, कोणत्या दिशेने फिरला, कोणत्या क्षणी स्पर्श झाला याची अचूक माहिती थेट व्हिडीओ असिस्टंट रेफरीकडे पोहोचणार आहे. त्यामुळे वादग्रस्त निर्णयांवर पडदा पडण्याची शक्यता वाढली आहे.

ऑफसाइड पकडणार ‘सुपर ब्रेन’

फुटबॉलमधील सर्वात वादग्रस्त निर्णय कोणता, असा प्रश्न विचारला तर बहुतेक जण ‘ऑफसाइड’ असेच उत्तर देतील. पण यंदा ऑफसाइडच्या वादांना पूर्णविराम देण्याचा फिफाचा प्रयत्न आहे. ‘सेमी-ऑटोमेटेड ऑफसाइड टेक्नॉलॉजी’च्या मदतीने आता अवघ्या 10 सेंटीमीटरच्या फरकाचाही अचूक शोध घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, निर्णयासाठी रेफरीला स्क्रीनकडे धाव घ्यावी लागणार नाही. प्रणाली थेट त्याच्या इअरपीसमध्ये ऑडिओ अलर्ट पाठवेल आणि क्षणार्धात निर्णय होईल.