कोल्हापूरात पाचवा कोरोनाबाधीत रुग्ण; मरकजहून परतलेल्या शाहूवाडीतील तरुणाला कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या दोन कोरोनाबाधीतांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असतानाच शाहुवाडीसारख्या दुर्गम तालुक्यातील एका छोट्या गावातील 30 वर्षांच्या युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी सकाळी उघड झाले आहे. दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेला हा तरुण कोरोना पॉझीटिव्ह असल्याचा अहवाल मिळाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.

हा तरुण दिल्लीतून 14 मार्चला निघाला होता. तो 16 मार्चला कोल्हापुरात आला. येथील धार्मिकस्थळी एक दिवस मुक्काम करून तो मलकापूरला खासगी वाहनातून गेला. मलकापूरमधील धार्मिक स्थळीही तो एक दिवस राहिला. यानंतर तो 18 मार्चला तो घरी परतला. पन्हाळा येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात 1 एप्रिलला प्रशासनाने त्याला दाखल केले होते. त्यावेळी मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या इतर प्रवाशांसोबतच त्याचाही स्वॕब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरुवारी मिळाला आहे. अहवालात हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला सीपीआरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याला कोल्हापुरातून मलकापूरला नेणाऱ्या त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य चौघांची तपासणीही करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर दिल्लीहून गावी आल्यानंतर आसपासच्या दहा-बारा गावात तो वावरल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेण्यात येत आहे.

एन.आय.व्ही.ला पाठवलेल्या 36 पैकी 34 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये इस्लामपूर येथील करोनाबाधीत कुटुंबाशी संपर्कात आलेल्या पेठवडगाव येथील युवती तसेच कोल्हापूर शहरात भक्तीपुजानगर,मंगळवारपेठ येथे पुण्याहुन आलेला करोनाबाधीत तरुण या दोघांचे दुसऱ्यांदा पाठविण्यात आलेले नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. ही दिलासा देणारी बाब असतानाच आता शाहुवाडीतील तरुणाची कोरोनाबाधितांमध्ये नव्याने भर पडली आहे.