गणपतीपुळे समुद्रात पाच जण बुडाले, चार जणांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
drowned

गणपतीपुळे येथे फिरायला आलेल्या  पर्यटकांपैकी पाच जण समुद्रात बुडाले. यातील चार जणांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. गणपतीपुळे येथील जीवरक्षकांनी चौघांना बुडताना वाचवले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रत्नाकर कल्पनाथ सरोज (24) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. गोलू समरजित सरोज (26), रोहित संजीवन वर्मा (23), कपिल रामशंकर वर्मा (28), मयूर सुधीर मिश्रा (28) यांना बुडताना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक मूळचे उत्तर प्रदेशातील असून सध्याचे त्यांचे वास्तव्याचे ठिकाण खेड तालुक्यातील लोटे हे आहे. रविवारी सायंकाळी समुद्रस्नानाचा आस्वाद घेण्यासाठी हे सर्वजण समुद्रात गेले असता रत्नाकर सरोज याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब त्यांच्या साथीदारांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून जीवरक्षक अक्षय माने, ओंकार गवाणकर, आशीष माने, अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर यांनी समुद्रात उडय़ा घेऊन पाचही जणांना पाण्याबाहेर काढले. परंतु रत्नाकर सरोज याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.