
गुगल मॅप्सच्या मदतीने ट्रेकिंगला चाललेले पाच इंजिनिअर घनदाट जंगलात अडकल्याची घटना समोर आली आहे. हितेश सुरेश पेनमुसु, हिमतेज वारा प्रसाद वाल स्वामी, विकियत नागेश्वर राव चिलियाला, लिहित चेतन्य मेका आणि सुशील रमेश भंडारू अशी अडकलेल्या इंजिनिअरची नावे आहेत. एका तरुणाने आईला याबाबत सांगितल्यानंतर आईने गृहमंत्र्यांना टॅग करून ट्वीट केले. यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी पोहचून सर्वांना सुखरुप बाहेर काढले.
मूळचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील हैदराबाद येथील पाच तरुण नर्मदा जिल्ह्यातील जारवानी जवळील जंगलात, स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात ट्रेकिंगसाठी आले होते. त्यांनी गुगल मॅप्स वापरून तुंगाई टेकडीचे स्थान ट्रॅक केले. पाचही जणांनी सकाळी जरवानी गावातील भांगडा फलियाजवळ त्यांच्या बाईक सोडून गुगल मॅप्स वापरून चढाईला सुरुवात केली. दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांना वाट चुकल्याचे लक्षात आले. गुगल मॅप्सने त्यांची दिशाभूल केली, ज्यामुळे त्यांचा मार्ग चुकला आणि ते जंगलात हरवले. पाच जणांनी जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मार्ग सापडला नाही.
एका तरुणाने त्याच्या आईला फोन करून याबाबत सांगितले. त्यानंतर त्याच्या आईने राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांना टॅग करून ट्विट केले. यानंतर नर्मदा पोलिसांनाही कळवण्यात आले. नर्मदा पोलिसांनी पाच तरुणांना शोधून काढले. सर्व तरुण नोकरीनिमित्त वडोदरा येथे राहत आहेत.