Breaking news – केदारनाथहून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले, 7 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले आहे. गौरीकुंड-सोनप्रयागच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान बाळाचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन एव्हिगेशनचे हे हेलिकॉप्टर होते. रविवारी सकाळी या हेलिकॉप्टरने केदारनाथहून गुप्तकाशीच्या दिशेने उड्डाण घेतले होते. पहाटे 5.20 च्या सुमारास हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. गौरीकुंड-सोनप्रयागच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे नंतर स्पष्ट झाले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तराखंडच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानेही याची पुष्टी केली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 7 जण होते. हेलिकॉप्टरमधील प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील असून मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती यूसीएडीएने दिली.

दरम्यान, अपघातानंतर हेलिकॉप्टरचे तुकडे होऊन आग लागली असून यात मृतदेहही जळाल्याचे कळते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघाताबाबत ट्विट केले आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना दु:खद आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक मदत आणि बचाव कार्यात उतरले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.