
कार चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबलं गेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक्सलेटर दाबलं गेल्याने कार अनियंत्रित झाली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यवतमाळमधील वणी घुग्गुस मार्गावर ही घटना घडली. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
वणी येथील लालपुलिया परिसरात राहणारे रियाज शेख हे गॅरेज चालवतात. ते घुग्गुस मार्गावर मुलीला कार चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. यावेळी कारमध्ये रियाज यांच्या अन्य दोन मुली आणि पुतणीही उपस्थित होत्या. जन्नत हाॅलजवळ मुलीचा ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडला. यामुळे कार अनियंञित झाली. कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरूद्ध दिशेला गेली आणि समेरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यात कारमधील चारही मुलींचा जागीच मृत्यू झाला तर रियाज यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
             
		





































 
     
    





















