
मुंबईत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली जाणार असून त्यातील 3 केंद्रे वरळी आणि प्रभादेवी परिसरात आहेत. मुंबईत सध्या पालिका, राज्य आणि केंद्र सरकारची 49 केंद्रे तर 71 खासगी अशी 120 लसीकरण केंद्रे आहेत.
मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिका आणखी पाच केंद्रे सुरू करणार आहेत. यात वरळीत 3 केंद्रे सुरू केली जाणार असून अन्य ठिकाणी 2 केंद्रे असतील. वरळी कोळीवाडा येथील पालिकेचा दवाखाना, प्रभादेवी प्रसूतीगृह आणि लोअर परळमधील रेल्वेचा दवाखाना या ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहे.
वरळीमध्ये रहिवाशांची गैरसोय होऊ नये आणि अन्य केंद्रावर ताण येऊ नये म्हणून तीन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. वरळीत आधीच पोतदार रुग्णालय, कामगार रुग्णालय आणि हाजी अलीजवळील एनएससीआयमध्ये लसीकरण केंद्रे सुरू आहेत. लसीकरणादरम्यान गर्दी होऊ नये आणि लसीकरण सुरळीत व्हावे, यासाठी महापालिका सर्वेतोपरी खबरदारी घेत आहे.
45 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणामुळे गर्दी
केंद्र सरकारने 45 वर्षांपुढील व्यक्तींना सरसकट लस देण्याचा निर्णय घेतल्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे वाढवण्यात यावीत, अशी मागणी होत होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी त्याचबरोबर 45 ते 59 आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस देण्यात येत आहे.

























































