सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवे पाच वाघ दाखल होणार! डेहराडूनच्या वन्यजीव संस्थेचा अभ्यास, काही गावांचे पुनर्वसन करुन राखीव क्षेत्र वाढवणार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ५ वाघ आणण्यात येणार आहेत. वन्यजीव संस्था डेहराडूनच्या अभ्यासानुसार सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पात सध्या २० वाघ व्यवस्थित राहू शकतील इतकी जागा आहे. या प्रकल्पातर्गत आतापर्यंत कोयना प्रकल्पात १ आणि चांदोली परिसरात २ असे ३ पट्टेरी वाघ ट्रॅप झाले आहेत. चौथा वाघ कोकणपट्ट्यात आढळून येतो.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटात स्थित एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे, जो २००८ मध्ये स्थापन झाला. हा प्रकल्प केवळ वाघांसाठीच नव्हे तर बिबट्या, गवा यांच्यासह इतर अनेक दुर्मीळ वनस्पती व प्राण्यांसाठी देखील एक सुरक्षित निवासस्थान आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट वन्यजीव आणि मानवी जीवनात संतुलन राखणे हे आहे, ज्यासाठी काही गावांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे. ४ हजार ५०० चौ. कि. मी. क्षेत्रात हा प्रकल्प विस्तारलेला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच वाघ आल्याने त्यांची संख्या ९ होईल. यानंतरही या प्रकल्पात ११ वाघ सहज राहू शकतील एवढं याचं क्षेत्रफळ आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघ नैसर्गिकपणे स्थिरावत नसल्याचा अनुभव आहे. स्थलांतर करुन वाघ येतो; परंतु तीन वर्षांपूर्वी येथे ५० चितळ सोडण्यात आली होती. चितळांची संख्या वाढेल, असे नियोजन वन विभागाने केले आहे. जेणेकरून वाघांचे नैसर्गिक खाद्य तयार होईल. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ आल्यानंतर येथील गव्यांपासून मानवी वस्तीतील त्रासही कमी होण्यास मदत होणार आहे. गवा हे वाघाचे नैसर्गिक आणि आवडते खाद्य असल्याने गव्यांची संख्या मर्यादित राहण्यासही मदत होईल. मात्र प्रकल्पात उरलेल्या गावांचे पुनर्वसन करून योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव भागामध्ये मध्ये बिबट्या आणि जंगली कुत्र्यांची वाढणारी संख्या वाघांना खाद्य मिळवण्यासाठीचा अडथळा ठरू शकतो. त्यासाठी सागरेश्वर अभयारण्य व कात्रज येथील सांबर आणि चितळ सोर्स पॉप्युलेशन म्हणून वापर करण्याचा विचार आहे. विपुल प्रमाणात जैवविविधता असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे भविष्यातील वाघांचे भवितव्य म्हणून पाहता येईल. या भागात वाघांचे अस्तित्व वाढले तर, परिसरात जंगलतोडीचे प्रमाणही कमी होईल. वृक्ष संवर्धन झाल्यास पशुपक्ष्यांची पैदास मोठ्या संख्येने होईल.

“सह्याद्री घाटमाथ्यावर ही वाट चिंचोळी आहे. मात्र चिंचोळा मार्ग वाघासाठी अडचणीचा ठरत असल्याने त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष आहे. जंगलाच्या सानिध्यात असणाऱ्या काही गावांचे पुनर्वसन करून वाघांचा भ्रमण मार्ग आणि अधिवास अधिक सक्षम करण्यावर वन विभागास काम करावे लागेल.”

किरण जगताप, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प