
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून हल्ला केला होता. हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर‘ राबवत दहशतवादी तळ नष्ट केले होते. यावेळी पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी हिंदुस्थानने केलेल्या पलटवारमध्ये पाकिस्तानचे पाच लढाऊ विमानं आणि एक मोठे एअरक्राफ्ट ‘एस-400’ या हवाई संरक्षण प्रणालीने पाडल्याचा दावा हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी बंगळुरू येथे बोलताना केला.
बंगळुरू येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह म्हणाले की, हिंदुस्थानच्या एस-400 या हवाई संरक्षण प्रणालीने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या पाच लढाऊ विमानं पाडली. यासोबत एक मोठे एअरक्राफ्ट (AEW&C/ELINT) 300 किलोमीटर अंतरावरून नष्ट करण्यात आले. एवढ्या अंतरावरून अचूक लक्ष्य साधण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. ऑपरेशन सिंदूर दरम्यान एस-400 हवाई संरक्षण प्रणालीने कमाल केली. यामुळे पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्ले यशस्वीरित्या परतवून लावण्यात आले.
हिंदुस्थानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे नुकसान झाल्याचे फोटोही आमच्याकडे आहेत. बहावलपूर येथील जैश मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले. तिथे कोणतेही अवशेष उरले नाहीत. आमच्याकडे फक्त सॅटेलाईट फोटोच नसून स्थानिक माध्यमांनी काढलेले फोटोही आहेत, असेही हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी मुरीदके येथील लश्कर-ए-तोएबाच्या मुख्यालयाचे हल्ल्याआधीचे आणि नंतरचे फोटोही दाखवले.
#WATCH | Bengaluru, Karnataka | Speaking on Operation Sindoor, Chief of the Air Staff, Air Chief Marshal AP Singh says, “…We have at least five fighters confirmed kills and one large aircraft, which could be either an ELINT aircraft or an AEW &C aircraft, which was taken on at… pic.twitter.com/ieL6Gka0rG
— ANI (@ANI) August 9, 2025
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या अनेक एअरबेसवर हल्ला करण्यात आला. शाहबाज जेकबाबाद हा त्यापैकी एक प्रमुख एअरबेस होता. तिथे एफ-16 चे हँगर असून त्याचा अर्धा भाग हवाई हल्ल्यात नष्ट झाला आणि तिथे असणारे विमानंही नष्ट झाली असावीत. तसेच भोलारी एअरबेसवरील आणखी एका मोठ्या विमानाला टार्गेटड करण्यात आल्याचे ते म्हणाले.