पंढरपुरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना अटक

पंढरपूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पंढरपूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ते पंढरपूर तालुक्यातील अनवली आणि गोपाळपूर येथील आहेत. सोमनाथ तानाती बनसोडे (वय 32), बिरुदेव शिवाजी कोकरे ( वय 35), शरद शिवाजी गांजाळे ( वय 36), प्रविण अशोक मेटकरी( वय 25), संजय ज्ञानेश्वर गडदे (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिद्धी सिद्धी गणपती मंदिराजवळ काही संशयित कारसह थांबले असून ते पंढरपूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी शिताफीने पाच संशयितांना अटक केली. त्यावेळी त्यांच्यातील एकाने पळ काढला होता. नंतर त्यालाही अटक करण्यात आली. या संशयितांकडे दोन कटावणी, एक वाय आकाराचा हूक, दोन डिझायर गाड्यांमध्ये दोन तलवारी, मोबाईल आढळले. ते जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या