दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलवाल्यांची चांदी! 16 फेब्रुवारीपासून ‘भारत एआय इम्पॅक्ट समिट’, 20 हजारांचे भाडे पाच लाखांपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलचालकांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे. जगातील टेक्नोलॉजीचा महाकुंभ म्हणून ओळखला जाणारा ‘भारत एआय इम्पॅक्ट समिट 2026’ हा कार्यक्रम दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे येत्या 16 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हा कार्यक्रम 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी जगभरातून दिग्गज लोक उपस्थित राहणार आहेत. यासाठी आतापासूनच पंचतारांकित हॉटेलची बुकिंग करण्यात आली आहे. काही हॉटेलची बुकिंग फुल्ल झाली आहे. 20 हजार रुपयांत मिळणाऱ्या हॉटेलचे भाडे थेट पाच लाखांपर्यंत पोहोचले आहे.

16 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करणाऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका दिवसांसाठी 20 ते 40 हजार या किंमतीत मिळणाऱ्या रूमची किंमत आता थेट 4 ते 5 लाखांपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीतील आयटीसी मौर्या, द लीला पॅलेस आणि ताज पॅलेससारख्या हॉटेलमध्ये एकही रूम खाली नाही. कनॉट पॅलेस आणि एरोसिटीच्या हॉटेलमध्येही मोठी मागणी आहे. या हॉटेलमध्ये एक दिवस थांबावेच लागेल, अशा अटी घातल्या जात आहेत. दिल्लीतील पर्यटन अर्थव्यवस्थेला एक नवीन ऊर्जा मिळत आहे.

पाहुण्यांची मांदियाळी

दिल्लीत होत असलेल्या या कार्यक्रमासाठी जवळपास 100 देशांतील पाहुणेमंडळी येत आहेत. यामध्ये 20 देशांचे राष्ट्राध्यक्ष, 100 सीईओ, 50 हून अधिक मंत्री, जगभरातील प्रसिद्ध टेक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अधिकारी, जवळपास 500 प्रसिद्ध शोधकर्ते आणि 50 हजारांपर्यंत लोक या कार्यक्रमासाठी येत आहेत. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत 35 हजारांहून अधिक नोंदणी झाली आहे.