
फार्महाऊसमधील सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एकाच कुटुंबातील 5 मजुरांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत एका मजुराची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासनाने मयताच्या वारसास प्रत्येकी 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले असून, जखमींच्या उपचाराची खर्चासह संपूर्ण जबाबदारीही शासनाने उचलली आहे.
सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शेतशिवारात मारुती दगडू राठोड यांच्या आखाड्यावर सेप्टिक टँक सफाईचे काम करताना काल गुरुवारी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान गुदमरून 5 मजुरांचा मृत्यू झाला. तर एका मजुराची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व मजूर एकाच कुटुंबातील असल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शेतशिवारात मारुती दगडू राठोड यांच्या शेतातील आखाड्यावर ही दुर्दैवी घटना घडली. राठोड यांचे फार्महाऊस आहे. येथील सेप्टिक टँकची सफाई करण्यासाठी राठोड यांनी सोनपेठ शहरातील सफाई कामगारांना बोलावले होते. गुरुवार, 11 मे रोजी दुपारी 3 ते 4 वाजेदरम्यान 6 मजूर फॉर्महाऊसवर हजर झाले. सफाई करण्यासाठी एक जण आत उतरला. काही मिनिटातच तो बेशुद्ध झाला. त्याला पाहण्यासाठी दुसरा आत उतरला. तोही बेशुद्ध पडला. एकमेकांना वाचवण्यासाठी पाच जण सेप्टिक टँकमध्ये उतरले. मात्र, कोणीच बाहेर येत नसल्याने बाहेरील एकाने आरडाओरडा केला.
मजुराचा आवाज ऐकून विठ्ठल राठोड तिथे आले. त्यांनी आवाज देऊन पाहिला पण कुणाचाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे तातडीने जेसीबीच्या साह्याने टँकवरील स्लॅब फोडण्यात आला. गुदमरून बेशुद्ध झालेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. पण पाच जणांचा मृत्यू झाला होता.
शेख सादेक (45), शेख शाहरुख (20), शेख जुनेद (29), शेख नवीद (25), शेख फिरोज (19) अशी मृतांची नावे असून हे सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. शेख साबेर (18) हा गंभीर असून, त्याच्यावर परळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.





























































