
भाडेकरार संपल्यानंतरही फ्लॅट सोडत नसल्यामुळे घरमालकाच्या कुटूंबीयांनी ऑनलाईन खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षेकला जीवे मारण्याची धमकी देत घरात कोंडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास विमाननगरमधील गुलमोहर रॉयल सोसायटीत घडली. याप्रकरणी घरमालक मरजाबान वेलाटी (रा. ठाणे, मुंबई) , नाहिद वेलाटी, ज्वेल मॉरीस पॉल (रा. विमाननगर) यांच्याविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्लायसा दीक्षित (वय 33) यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लायसा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन खासगी क्लासेस घेतात. त्यांनी वेलाटी यांचा फ्लॅट भाडेकरार करून राहण्यासाठी घेतला होता. त्यानंतर त्या नियमितपणे घरभाडे देत होत्या. काही दिवसांपूर्वी घराचा करार संपल्यामुळे वेलाटी कुटूंबीयांनी स्लायसा यांना फ्लॅट सोडण्यासाठी तगादा लावला होता.
भाडेकरार संपल्यानंतरही स्लायसा फ्लॅट सोडत नसल्यामुळे दोन दिवसांपुर्वी वेलाटी कुटूंबीय स्लायसा राहत असलेल्या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी स्लायसाला तू फ्लॅट का खाली करीत नाहीस, अशी विचारणा करून शिवीगाळ केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत स्लायसा राहत असलेल्या फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून त्याना कोंडून ठेवले. घर भाडेकरू महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत कोंडून ठेवल्यामुळे संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक लहाने यांनी दिली.



























































