धामणा नदीला मोठा पूर, पुलाचे काम रखडल्याने बुलडाणा-संभाजीनगरचा संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पारध

सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे धामणा नदीला मोठा पूर आल्याने म्हसला गावाजवळील नदीतून तयार केलेला पर्यायी मार्ग बंद झाला आहे. परिणामी बुलडाणा ते संभाजीनगरचा संपर्क आता कायमचा तुटला आहे. जोपर्यंत नदीमध्ये पाणी राहील तोपर्यंत ही वाहतूक ठप्प राहील. दरम्यान, एसटी महामंडळाने पर्यायी मार्ग म्हणून धाड, पारध, पिंपळगाव रेणुकाईमार्गे भोकरदन, संभाजीनगर अशी बसेसची वाहतूक वळविली आहे. धामणा नदीला दोन वर्षांत पहिल्यांदाच पूर आला आहे.

बुलडाणा ते संभाजीनगर राष्ट्रीय मार्गावर धाडपासून पुढे म्हसला गावाजवळ धामणा नदीवर पूल उभारण्यात येत आहे. पुलाचे काम चालू असतानाच ठेकेदाराने जुना पूल तोडून नदीतूनच पर्यायी मार्ग सुरू केला होता. मात्र, काही दिवसांतच ठेकेदार काम सोडून पळून गेल्याने पुलाचे काम रखडले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात प्रशासनानेही काहीच दखल घेतली नाही. त्यामुळे पावसाळ्यात सर्वांचीच मोठी अडचण झाली आहे. पूर आल्याने पर्यायी मार्ग बंद झाला असून, बुलडाणा ते संभाजीनगर मार्गावरील वाहतूक कायमची बंद झाली आहे. म्हसला, मौंढाळा, जांब, बोदेगावसह मराठवाड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पुलाचे काम तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकत नसल्याने ठेकेदाराने जुना पूल तोडून केलेली घोडचूक जनतेला आगामी काही महिने भोगावी लागणार आहे. पूर आल्याने या नदीत पावसाळाभर पाणी राहणार असल्याने तेथून एसटी बसेस जाणे शक्य नाही. पाणी कमी झाले तरीही वाळू आणि गाळामुळे वाहने जावूच शकणार नाहीत अशी परिस्थिती केवळ आणि केवळ ठेकेदाराने निर्माण करून ठेवल्याचे लोक बोलत आहेत. एसटी महामंडळाने संभाजीनगरला जाण्या व येण्याकरिता धाड, धामणगाव, पारध, पिंपळगाव रेणुकाई ते भोकरदनमार्गाचा पर्याय शोधून बसेसची वाहतूक सुरू केली आहे. तसेच दुसरा जाफराबाद, टेंभुर्णी, राजूर (गणपती), हसनाबाद हासुद्धा संभाजीनगरला पर्यायी मार्ग आहे. खासगी वाहनधारकसुद्धा या दोन्ही मार्गांचा वापर करू शकतात.