
मराठवाडय़ात महापुराच्या तडाख्यात शेतीसह संसारही वाहून गेले. धाराशीव, नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालन्याला पडलेली महापुराची मगरमिठी अजूनही सैल झालेली नाही. माजलगाव आणि जायकवाडी धरणातून सातत्याने विसर्ग चालू असल्यामुळे नांदेड, बीड तसेच परभणी, जालन्याच्या गोदाकाठी प्रचंड दहशत आहे. शेतांमध्ये अद्याप गुडघाभर पाणी असल्यामुळे पंचनामेही रखडले आहेत. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदतही केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकऱयांसमोर आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱया संततधार पावसाने मराठवाडय़ाचा भौगोलिक नकाशाच बदलून टाकला. मराठवाडय़ातील गोदावरी, मांजरा, तेरणा, आसना, पूर्णा, दुधना, बिंदूसरा, सिंदफणा, कडा आदी महत्त्वाच्या नद्यांनी पावसाचा भार सहन न झाल्यामुळे पात्र बदलले. काही ठिकाणी नद्यांचे पात्र दुभंग झाले. पावसाचा जोर एवढा भयानक होता की लाखो हेक्टर शेतजमीन अक्षरशः खरवडून गेली. खरीपाचा हंगाम तर महापुरात बुडाला, पण रबी हंगामाची जोजवण कशी करायची असा यक्ष प्रश्न शेतकऱयांसमोर आहे, कारण शेतात कपाळी लावायलाही माती उरली नाही. होते नव्हते ते पीक पुरात वाहून गेले. शेतात शिल्लक राहिलेले सडले. पाण्याचा निचरा कधी होणार? पंचनामे होऊन मदत कधी मिळणार? याचे उत्तर कोणाकडेही नाही. नदीकाठी असणारे गोरगरिबांचे संसार रात्रीतून उघडय़ावर आले. धाराशिव, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या आठही जिल्हय़ातील पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. हवामान खात्याने आता पुन्हा चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. या चार दिवसात पाऊस झाला तर पूरस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.