पूर ओसरतोय, धसका कायम! जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे दर गगनाला भिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सांगली / कोल्हापूर

अलमट्टी धरणातून होणाऱया विसर्गामुळे सांगली, कोल्हापुरातील पुराचे पाणी आता हळूहळू कमी होत आहे. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत सुमारे सहा फुटांची घट झाली आहे तर सांगलीत कृष्णेची पातळी 52 फुटांपर्यंत खाली आली आहे. मात्र, जसजशी पुराच्या पाण्याची पातळी कमी होतेय तसतसे नवे आव्हान समोर दिसू लागलेय. मृत जनावरांचा खच आता या पाण्यातून वर आलाय. काही स्वयंसेवी संस्था ही मृत जनावरे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतायत. अनेक ठिकाणी वैद्यकीय पथके पूरग्रस्तांना प्राथमिक उपचार देतायत. साथीच्या रोगांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूरग्रस्तांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातायत. दरम्यान, पुराच्या नावाखाली चढय़ा दराने वस्तूंची विक्री करणाऱयांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱयाजवळील पाणीपातळी आज सकाळी 7 वाजता 50 फूट 11 इंच होती. सायंकाळी पाच वाजता ही पातळी 49 फूट 10 इंच झाली होती तर अजूनही जिह्यातील 104 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

40 जणांचा मृत्यू
पुणे महसूल विभागात पुरामुळे आजपर्यंत 40जणांचा मृत्यू झाला असून 20जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक 16 जण सांगली जिह्यातील तर कोल्हापूरमधील सहा जणांचा समावेश आहे. सातारा आणि पुणे जिह्यात प्रत्येकी सात जणांचा मृत्यू झाला आहे.

48 तास लागणार
पूरपातळी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीत कृष्णेची पाणीपातळी 56 फुटांवरून 53 फुटांपर्यंत आली आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगेची पाणीपातळी 50 फुटांवर आली आहे. ही पाणीपातळी ओसरत असून अलमट्टी धरणातून सव्वापाच लाख क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग कायम ठेवल्यास आणि पावसाचे प्रमाण स्थिर राहिल्यास येत्या 48 तासांत पाणी ओसरेल असा अंदाज असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे-बंगळुरू महामार्ग आज सुरू होण्याची शक्यता
पूरस्थितीमुळे गेल्या सहा दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगळुरू महामार्ग सुरू करण्यासाठी रविवारी सकाळी जड वाहतुकीची चाचणी घेण्यात आली. पुराच्या पाण्याला वेग असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र सोमवारपासून वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शिरोळमधील दीड लाख लोक विस्थापित
जयसिंगपूर – पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी घट झाल्याने आणि कोयना धरणातून विसर्ग कमी केल्याने पुराची तीव्रता कमी होत आहे. फुटाफुटाने चढलेला पूर इंचाइंचाने उतरू लागला आहे. तरीही पुराच्या पाण्यात अडकलेल्या तालुक्यातील अनेक गावांमधून लोकांना वाचविण्याचे कार्य सुरूच आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यातील 42 गावांमधील दीड लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शिरोळमधील 9 गावांना पुराच्या पाण्याचा पूर्ण विळखा बसला आहे. या गावांसह पुराच्या पाण्यात अडकलेल्या तब्बल 1 लाख 52 हजार 825 लोकांना विविध ठिकाणी उभारलेल्या निवारा केंद्रांत स्थलांतरित करण्यात आले आहे. यासाठी 81 निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. एनडीआरएफ, नौदल, लष्कराचे 456 जवान 47 बोटींद्वारे बचावकार्य करत आहेत.

पूरग्रस्तांना उद्यापासून पाच हजारांची मदत
सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मंगळपासून मदतीचे पाच हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार असून रोख रक्कम देताना आपत्तीग्रस्तांकडून बँकेचे पासबुक किंवा चेकबुक मागितले जाणार नाही. स्लिप भरून पैसे दिले जातील. आधारकार्डवरून ओळख पटविण्यात येणार आहे. आधारकार्ड नसेल तर पूरग्रस्त कुटुंबात त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीचे आधारकार्ड पाहून रोख रक्कम दिली जाणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

6 लाख 90 हजार जणांचे स्थलांतर
सांगली जिह्यातील 4 लाख 45 हजार तर कोल्हापूरमधील दोन लाख 45 हजार जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सांगलीत 95 बोटी, 270 जवान कार्यरत असून कोल्हापूरमध्ये 53 बचाव पथके, 87 बोटी आणि 501 जवान बचावकार्य करीत आहेत. वैद्यकीय मदतीसाठी तीन जिह्यांमध्ये 302 पथके कार्यरत आहेत. तीन लाख 29 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा आपत्तीमुळे अद्यापि खंडित आहे.

सकाळी सातच्या आकडेवारीनुसार पंचगंगा आणि कृष्णा नदीतून अलमट्टी धरणात 6 लाख 80 हजार 278 क्युसेक्स पाणी जमा होत होते तर अलमट्टीतून केवळ 5 लाख 30 हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू होता.

पाणीपातळी (फूट)
सांगली 54.04
कोल्हापूर 49.10

हे खरे रक्षाबंधन!
जेव्हा वाचण्याच्या सर्वच शक्यता धुसर झाल्या होत्या तेव्हा नौदलाचे जवान देवासारखे आणि भावासारखे धावून आले. कोल्हापुरातील राजापूर गावच्या महिलांनी सुरक्षितस्थळी पोहोचल्यावर या जवानांना राखी बांधली आणि खरे रक्षाबंधन साजरे झाले.