
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने बुधवारी रात्री 39 फुटांची इशारा पातळी गाठलेल्या पंचगंगा नदीने आज दुपारी चारच्या सुमारास 43 फुटांची धोकापातळी ओलांडली. सायंकाळी सातच्या सुमारास ही पाणीपातळी 43.7 फूट झाली होती. शहरात कुंभार गल्लीसह अनेक घरांत पुराचे पाणी घुसू लागले असून, पूरग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येऊ लागले आहे. ऐतिहासिक राधानगरी धरण सायंकाळी शंभर टक्के भरल्याने स्वयंचलित 3 आणि 6 क्रमांकाचे दरवाजे उघडले असून, 2800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
आज दुसऱया दिवशीही सायंकाळपर्यंत 102 बंधारे पाण्याखाली राहिले. यातील चार बंधाऱयांवरील पाणी कमी झाल्याने, 98 बंधारे पाण्याखाली गेले होते. सकाळी कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर रेडेडोह फुटल्याने, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्ग बंद झाला आहे, तर सायंकाळी चारपर्यंत 32 मार्ग बंद झाले होते.
आणखी दोन एनडीआरएफची पथके जिल्ह्यात दाखल
कोल्हापूर जिल्ह्यात 55 बोटी कार्यान्वित असून, 15 जुलै रोजी एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात दाखल झाली होती. पथकप्रमुख शिवप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक पथक 22 जवान 2 बोटींसह सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे सकाळी रवाना झाले. मनोजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील एक पथक कोल्हापूर शहरात तैनात करण्यात आले आहे. संभाव्य पूरस्थितीत नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी आज आणखी दोन पथके आली आहेत.




























































