जे.जे.मधील फ्लोसायटोमीटर पाच वर्षांपासून बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

रक्तातील दुर्मिळ आजार, संसर्ग तसेच कॅन्सरच्या निदानासाठी वापरण्यात येणार्‍या सुमारे एक कोटी रुपयांचे फ्लोसायटोमीटर  मशीन्स जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाच वर्षांपासून विनावापर पडून असल्याचे आज राज्य सरकारने विधानसभेत एका प्रश्नावरील उत्तरात मान्य केले. मशीनचा वापर होत नसल्याबद्दल आरोग्य महासंचालनालयामार्फत चौकशी सुरू असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज  लेखी उत्तरात सांगितले.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रक्तातील दुर्मिळ आजार, संसर्ग तसेच कॅन्सरच्या निदानासाठी वापरण्यात येणार्‍या  एक कोटी पाच लाख रुपयांच्या फ्लोसायटोमीटर आणि इम्युनोहिस्ट्रकेमिस्ट्री या दोन मशीन्स मागील पाच वर्षांपासून वापराविना पडून असल्यामुळे अनेक रुग्णांना स्वखर्चाने चाचण्या कराव्या लागत असल्याबद्द ऍड. भीमराव धोंडे, सुनील शिंदे, प्रकाश फातर्फेकर, सुनील राऊत, सुनील प्रभू, संजय पोतनीस, भरतशेठ गोगावले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी  लेखी उत्तर दिले. फ्लोसायटोमीटर व इम्युहिस्ट्रीकेमिस्ट्री यंत्राचा पुरवठा न झाल्यामुळे हे यंत्र प्रस्थापित करण्यात आलेले नाही असे लेखी उत्तरात स्पष्ट केले. फ्लोसायटोमीटर व इम्युनिटी केमिस्ट्री यंत्राबाबत आरोग्य संचालनालयामार्फत समिती स्थापन करुन चौकशी करण्यात येत आहे. या रुग्णालयातील विविध विभागांत 80 व्हेंटीलेटर व्यवस्थितरीत्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.