‘फ्लाईंग सीख’ मिल्खा सिंह यांचे निधन, चंदीगढमध्ये घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षाचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सिंह नंतर कोरोनातून बरेही झाले होते, पण अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगढच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी 11.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.

मिल्खा सिंह यांच्या घरातील एका नोकराला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 20 मे रोजी मिल्खा सिंह आणि त्यांच्या पत्नी निर्मला कौर यांना कोरोनाची लागण झाली. 24 मे रोजी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 30 मे रोजी सिंह बरे होऊन डिस्चार्जही मिळाला होता. परंतु 3 मे रोजी ऑक्सिजन खालावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरूवारी त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. शुक्रवारी त्यांची पुन्हा त्यांची तब्येत खालावली. सिंह यांना ताप आला आणि ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. अखेर शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

मिल्खा सिंह यांनी चारवेळा आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. तर 1958 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक जिंकले होते. 1956 आणि 1964 च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. तर 1959 साली त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2013 साली त्यांच्या आयुष्यावर आधारित भाग मिल्खा भाग हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.