
सामना प्रतिनिधी । नगर
छावणीतील जनावरांना बारकोड टॅगींग व मोबाईल स्कॅनिंगला छावणी चालकांनी विरोध केला आहे. त्या संदर्भातील निवेदन नगर तालुका छावणी चालकांच्या वतीने शुक्रवारी तहसीलदार रोहणी नर्हे यांना देण्यात आले आहे.
नगर तालुक्यातील छावणी चालकांचा शासन निर्णय दिनांक 4 मे नुसार दिनांक 15 मे पासून छावणीमध्ये दाखल असणार्या सर्व जनावरांना बारकोड टॅगींग करुन त्याला अॅड्रॉईड मोबाईलवर स्कॅनिंग करुन जनावरांची दैनंदिन आकडेवारी द्यायची आहे. तसेच या प्रणालीचा वापर छावणीचालकांना अनुदान प्राप्त करताना होणार आहे, असे 4 मे 2019 च्या शासकीय परिपत्रकात स्पष्ट लिहिलेले आहे. वरील विषयाचा सर्व सार पाहता, ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय क्लीष्ट व गुंतागुंतीची आहे. तरी या सर्व प्रक्रियेस छावणीचालक तयार नाहीत. कारण ही एकतर 15 किलो ऐवजी 18 किलो चारा देणे यामुळे छावणीचालक अगोदरच आर्थिक अडचणीत आहेत. त्यात आणखी अतिरिक्त मनुष्यबळ तसेच टॅगींग करुन स्कॅनिंगसाठी पुन्हा मनुष्यबह हे आता परवडणारे नाही. तसेच बारकोड स्कॅनिंग ही प्रक्रिया तेही जनावरांच्या कानावर बसवायची, ही प्रकिया या अगोदर आम्ही वापरलेली नाही. त्यामुळे ही वापरताना येणारे अडथळे व आवाहने यामुळे शासन व छावणीचालक यांच्यामध्ये तांत्रिक अडचणीची दरी तयार होऊ शकते. त्यामुळे अगोदरच दोन ते अडची महिने अनुदान नाही आणि पुन्हा तांत्रिक अडचण आली तर पुन्हा अनुदान मंजुरीसाठी अडचण होऊ शकते. म्हणून ही प्रक्रिया किचकट व पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी वेळखाऊ आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
छावण्या चालू करत असताना ही बाब जर असती तरी ती आम्ही स्विकारली असती. परंतु आता छावण्या बंद होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. यात ही किचकट प्रकिया हे छावणीचालकांना शक्य नाही. आम्ही सर्वजण स्पष्ट नमूद करतो कारण एका जनावराला बारकोडचा टॅग लावायचा त्यानंतर तो स्कॅन करायचे. येथे एक जनावर पकडून त्याला स्कॅन करणे सोपे नाही आणि ही रखड रोजच करायची. जेथे 6 मनुष्यबळ आहे त्या ठिकाणी 12 मनुष्यबळ लागेल. त्यात येणारे दिवस वादळवारा या नैसर्गिक आपत्तीचे आहेत. छावणीचालक अगोदरच दप्तर व घातलेल्या जाचक अटींनी हैराण झालेले आहेत आणि वरुन या नव्या अटींमुळे वैतगले आहेत.
जनावरांना बारकोड टॅगींग व नियमित स्कॅनिंग करताना छावनीतील कर्मचाऱ्यांना जनावरे गंभीर स्वरुपाची शारीरिक इजा करण्याची शक्यता आहे, याची जबाबदारी कोणी घ्यायची हा एक प्रश्न आहे. तसेच एप्रिल अखेर वाढीव चार्याचे दर, पाण्याची दुरावस्था, त्यातच शासनाने दिनांक 4 मे पासून प्रती मोठे जनावर 15 ऐवजी 18 किलो व लहान जनावर 7.5 ऐवजी 9 किलो या प्रमाणे चार्याची वाढ केलेली आहे. परिणामी छावणी चालक प्रतिदिवस प्रती मोठे जनावर 35 रुपये व लहान जनावर 20 रुपये नुकसानीमध्ये आहे. तरी शासनाने याबाबीचा विचार करुन दिनांक 1 मे 2019 पासून मोठे जनावर 120 रुपये व लहान जनावर 60 रुपये प्रमाणे अनुदानात वाढ करावी, अशी छावणी चालकांची मागणी आहे.
नगर तालुका छावणी चालकांच्यावतीने तहसीलदार रोहणी नर्हे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक संदिप कर्डिले, रेवण चोभे,दिलीप भालसिंग,भाऊसाहेब काळे,अभिजीत घिगे, संजय काळे,संतोष भापकर,बाबासाहेब काळे, जगन्नाथ मगर,कान्हूभाऊ कासार,बन्सी कराळे,अरुण कोठुळे,अभिलाश पाटील, उध्दव कांबळे, अशोक झरेकर, भिमराज लांडे, अनिल पालवे,श्रीकांत जगदाळे,राजू लांडगे,बाजीराव हजारे तसेच सर्व छावणी चालक व प्रतिनिधी उपस्थित होते.


























































