
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
गेले दोन दिवस वातावरणातील गारवा वाढत आहे. कोकणातील वातावरण आल्हाददायक बनले आहे. दाट धुक्यात पायवाटा आणि रस्तेही हरवून जात आहेत. या हरवलेल्या रानवाटांवर दवबिंदूंमधून डोकावणारे सप्तरंग आणि थंडगार वाऱ्याच्या झोतांनी रोमांचित झालेलं मन प्रफुल्लित होत आहे.
१८ ऑक्टोबर पर्यंत दमदार पाऊस पडल्याने जमिनीत गारवा आहे. पावसाने यावर्षी आपली सरासरी पूर्ण केल्याने तुलनेत थंडीही दीर्घकाळ असेल, असा जाणकारांचा अंदाज खरा होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. कोकणात थंडीची चाहूल लागताच शेतकरी रब्बी पिकांच्या लागवडीसह भाजीपाल्याची पेरणी करण्याच्या कामात मग्न झाल्याचं दृष्य सर्वच भागात पाहायला मिळत आहे.
सायंकाळी सहा वाजल्यापासूनच हवेत निर्माण होणारा गारवा रात्र सरु लागताच वाढत जातो. जोडीला असणारं दाट धुकं आपल्या सोबत थपथपणारं दव घेऊन येत असल्याने रस्ते आणि पायवाटा ओल्या चिंब होवून जातात. दवाचं प्रमाण एवढं असतं, की घरांच्या कौलांवरुन पाण्याचे थेंब अंगणामध्ये ठिपकत असतात. या आल्हाददायक वातावरणाची भुरळ केवळ कोकणवासीयांनाच पडते असे नव्हे, तर ती कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांसाठी अनोख्या आनंदाची एक पर्वणीच ठरते. थंडी पडू लागल्यानंतर बाजारात गरम कपड्यांची विक्री जोरात सुरु झाली असून सकाळच्या धुंद वातावरणात फिरायला जाणाऱ्या मंडळींची संख्याही कमालीची वाढली आहे.
वातावरणात निर्माण झालेला गारवा आणि दव रब्बी पिकांसाठी पोषक असून पावटा, कुळीथ, चवळी, मटकी आदी रब्बी पिकांच्या लागवडीसह भाजीपाला करण्यासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरु झाली आहे. पूर्वी भातशेती नंतर मोकळी रहाणारी कोकणातील बहुतांशी शेती आता बऱ्याच प्रमाणात बचतगटांच्या माध्यमातून भाजीपाला आणि रब्बी पिकांच्या लागवडीखाली येत असल्याने उन्हाळ्यातील शेती उत्पन्नातून शेतकरी आणि महिला बचत गट सक्षम होवू लागले आहेत. हिवाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून सकाळच्या वेळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे वातावरण आणखी आल्हाददायक बनत आहे.





















































