
‘रुपेरी उन्हात धुके दाटलेले, दुधी चांदणे हे जणु गोठलेले…’ या कवितेत वर्णिलेला हा निसर्ग सध्या धुळेकर प्रत्यक्ष अनुभवत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिह्याच्या तापमानाचा पारा 12 अंशापर्यंत खाली आला आहे. सर्वत्र पसरलेली थंडी आणि त्यातच सूर्योदयापूर्वी सर्वदूर निर्माण झालेले दाट धुके यामुळे निसर्गाचा आगळावेगळा आविष्कार धुळेकर अनुभवत आहेत. थंडी आणि धुके एकत्रितपणे अनुभवण्यासाठी आता अनेक जण सूर्योदयापूर्वी फेरफटका मारण्यास घराबाहेर पडू लागले आहेत.
मागील तीन वर्षांत जिह्यात सरासरीच्या तुलनेत 60 टक्के पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली. दुष्काळ अनुभवणाऱया धुळे जिह्यात यंदा मात्र विरुद्ध टोकाची परिस्थिती निर्माण झाली. यंदा सरासरीपेक्षा 40 टक्के पाऊस जास्त झाला. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. तापमानात घट होऊ लागली आहे. सध्या तापमानाचा पारा 12 अंशापर्यंत खाली घसरला आहे. अशा परिस्थितीत आगळावेगळा बदल घडला आहे. सकाळी थंडी असतानाच आता धुक्याची दाट चादर शहरात पसरली आहे. त्यामुळे सूर्योदयापूर्वी अनेक जण थंडी आणि धुके अनुभवण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. सूर्योदय झाल्यानंतरही सुमारे दोन ते तीन तास धुके कायम राहते. सोनेरी सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्यास धुके अडथळा निर्माण करीत आहे. दाट धुक्याची चादर सूर्योदयानंतर मात्र पातळ होत जाते आणि नंतर धुके बेपत्ता होते. निसर्गातला हा आगळावेगळा बदल शाळकरी मुले अनुभवत आहेत. परंतु हा बदल अनुभवण्यासाठी मुलांना शाळेपर्यंत पोहोचविण्याच्या निमित्ताने पालकदेखील घराबाहेर पडत आहेत. सुमारे तीन वर्षांनंतर धुके अनुभवण्याची संधी निर्माण झाल्याने अनेक तरुण आणि मध्यमवयस्क सकाळी घराबाहेर पडत आहेत. यंदा अद्यापही शहरातून वाहणारी पांझरा प्रवाही आहे. त्यामुळे दाट धुक्याची चादर पांझरेच्या पात्रात पाहण्यासाठी अनेक जण पांझरेच्या दोन्ही काठी विसावत आहेत.
शहर तसेच परिसरातील वातावरणात मोठय़ा प्रमाणावर बदल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात गारवा जाणवत होता. ढगाळ वातावरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर तसेच परिसरात सकाळी धुके दिसून येत आहे. शनिवारी दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात दुपारी दीडच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे मोठय़ा प्रमाणात धुके दाटले होते. लळिंग घाटात मोठय़ा प्रमाणात धुके असल्याने महामार्गावरून जाणाऱया वाहनांना दिवे लावून मार्गक्रमण करावा लागत होते. धुके आणि ढगाळ वातावरणामुळे फारुकी राजांच्या काळापासून असलेल्या किल्ल्यावरदेखील मोठय़ा प्रमाणात धुके दिसत होते. धुक्यांमुळे असणाऱया अस्पष्ट प्रकाशामुळे लळिंग किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडली.

























































