
>> देवेंद्र भोगले
फूड डिलिव्हरी अॅप्सवरून कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यात कफ सिरप, झोपेच्या गोळ्या, ऑर्थोपीडिकच्या गोळ्यांसोबतच गर्भनिरोधक गोळ्या आणि कामोत्तेजक औषधे सहज उपलब्ध होत आहेत. त्यावर सरकारकडून कारवाईचे कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यातील काही औषधे तरुणांकडून नशेसाठी वापरली जात असल्याने ही बाब अधिकच गंभीर बनली आहे.
ऑनलाईन औषध विक्री करणाऱया अॅप्सवर कारवाई करण्याची मागणी केमिस्ट दुकानदारांनी केली आहे. सध्या 134 पेक्षा जास्त अॅप्सवरून ऑनलाईन औषध विक्री केली जाते. प्रिस्क्रिप्शनशिवाय ती औषधे 20 ते 25 टक्के सवलतीमध्ये घरपोच मिळत असल्याचा गैरफायदा तरुण पिढीकडून घेतला जात आहे. कफ सिरप, झोपेच्या गोळ्या, गर्भनिरोधक गोळ्या, व्हायग्रा आणि गुंगी आणणारी औषधे ऑनलाईन मागवली जात आहेत. हे रोखण्यासाठी ऑनलाईन औषध विक्रीवर बंधने घालण्याची मागणी महाराष्ट्र केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली.
गर्भपाताच्या गोळ्याही सवलतीत
ऑनलाईन औषध विक्रीवर कोणाचेच नियंत्रण नाही. गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्याच देखरेखीखाली घ्यावा लागतात. पण या गोळ्या ऑनलाईन अॅप्सवरून सवलतीत मिळत आहेत. हे वेळीच रोखले पाहिजे, असे महाराष्ट्र केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष प्रसाद दानवे म्हणाले.
नियंत्रक काय करताहेत?
धंदा होतोय म्हणून ऑनलाईन अॅप्सवाल्यांनी फूड विक्रीसोबत औषधे विकायला सुरुवात केली. मोठी सवलत देऊन कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय, पडताळणीशिवाय ती औषधे ते विकत आहेत. औषध नियंत्रकांचेही ऑनलाईन विक्रीवर (ड्रग्ज पंट्रोलर) नियंत्रण नाही. हे एक प्रकारचे षड्यंत्रच आहे, असा आरोप महाराष्ट्र केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केला आहे.

































































