अन्नदान महायज्ञाची वर्षपूर्ती, 365 दिवसांत 36 हजार जणांची भूक भागवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊन काळामध्ये रस्ते, पदपथ, झोपडपट्टीत राहणारे, हातावर पोट असलेल्यांचे दोन वेळच्या जेवणासाठी प्रचंड हाल झाले. त्यामुळे शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी मदतीचा हात पुढे केला. पण जसजसे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले तशी अनेकांनी आपली मदत थांबवली. पण रस्ते, पदपथावरील नागरिकांसाठी मे 2020 मध्ये जेवण पुरवण्याचा सुरू केलेला महायज्ञ मुंबईतील अॅड. वैभव थोरात या शिवसैनिकाने अद्याप कायम ठेवला आहे. गरीबांची भूक भागवण्याच्या महायज्ञाची 1 मे रोजी वर्षपूर्ती झाली आहे. या 365 दिवसांमध्ये त्यांनी तब्बल 36 हजारपेक्षा अधिक लोकांची भूक शमवली आहे.

यासाठी भायखळा येथे एक किचन सुरू केले. पालिकेच्या आवश्यक परवानगी घेतल्यानंतर मे महिन्यामध्ये किचन सुरू झाले. त्यानंतर दररोज रात्री 100 लोकांना ताजे आणि पौष्टिक जेवण पुरविण्यास वैभवने सुरुवात केली. ती आजतागायत सुरू आहे.

पोलिसांनाही पुरवले जेवण 

लॉकडाऊन काळामध्ये गरीबांना जेवण देत असताना अनेकदा डय़ुटीवर असलेल्या पोलिसांना वेळेवर जेवण मिळत नसल्याचे दिसून येई. त्यावेळी त्यांनाही जेवण देत असल्याचे उद्योजक अॅड. वैभव थोरात यांनी सांगितले.