बेस्ट डोसा मेकर

1130

>> विष्णू मनोहर

अश्विनी भावे… साधे.. सात्त्विक अन्न विशेष आवडत असले तरी पुढय़ात आलेले टाकायचे नाही या अन्न संस्कारामुळे सगळेच पदार्थ आवडतात…

हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वोच्च शिखरावर असताना 20 वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेणारी गुणी मराठी अभिनेत्री. आईवडिलांचे संस्कार असलेलं मराठमोळं घर, आई उत्तम शिक्षिका सतत प्रोत्साहन देणारी. त्यामुळेच अश्विनी भावे यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. सध्या मी अमेरिकेत असल्यामुळे अश्विनीची भेट घेण्याचा योग आला. ‘सामना’साठी तुझी मुलाखत हवी आहे, असं विचारल्यावर तिने संकोच न करता होकार दिला व कुठलेही आढेवेढे न घेता ती आणि तिचे पती (किशोर) विष्णूजी की रसोईला जेवायला आले. अतिशय साधं आणि मनमिळाऊ जोडपं.

अश्विनी अभिनेत्री आहेच शिवाय एक उत्तम लेखिकासुद्धा आहे. सध्या तिच्या आईवर तिने लिहिलेला एक लेख खूप गाजतो आहे. परदेशात घडलेला किस्सा सांगताना ती म्हणाली की, ‘हीना’ चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना त्यांची एका इटालियन जोडप्याशी ओळख झाली आणि त्यांनी अश्विनीला आणि त्यांच्या आईला रेस्टॉरंटमध्ये जेवायला बोलावलं. अश्विनी हिंदुस्थानात असताना चीजबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. पनीर कधी कधी घरी यायचं. तर त्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारे चीजच्या स्लाइस कलात्मकरीत्या प्लेटमध्ये सजवून दिले. दिसायला अतिशय सुंदर अशी ती चीज प्लेट होती. त्यातलं तिने ‘ब्लू चीज’ चाखून पाहिलं तर त्यांची चव इतकी भयानक होती की तिला ते आवडले नाही. पण त्यांच्या प्रेझेंटेशनवर मात्र तिने त्यांना 100 गुण दिले. नंतर इटालियन कपलने आणलेली एक्सप्रेसो कॉफी इतकी कडू होती की, त्यामुळे त्यांना रात्रभर झोप आली नाही. हा विदेशी खाण्याच्या पहिला अनुभव तिला जसाचा जसा अजूनही आठवतो.

आमच्या घरात पानात जे काही असेल ते खाण्याची शिस्त असल्यामुळे मला सर्व प्रकारचं जेवण आवडतं. अशी वेगळी काही वैशिष्टय़ं नाही. ती म्हणाली की, मला जगातील सर्व प्रकारचं जेवण आवडतं. मी मुळात शाकाहारी असल्यामूळे मला आमटी-भात दिला तर नक्की आवडेल कधीही…पण आता ज्या वातावरणात राहते त्यानुसार इथलं जेवण आपलसं करून घेतलं आहे. तुला स्वयंपाक करायला आवडतो का या प्रश्नाचं उत्तर मला त्यांच्याकडे जेवायला गेलो असताना मिळालं. आमच्यासाठी त्यांनी जो स्वंयपाक केला तो उत्तम होता. सगळे पदार्थ करताना अश्विनी स्वतः लक्ष देत होती. तिला खिलवायला आणि बनवायला आवडतं हे तिच्या कृतीतून दिसतं होतं. जेवणात त्यांनी दोन इस्रायली पदार्थ तयार केले होते. त्यात मुगाच्या डाळीचं सॅलड होतं व आपल्या वांग्याच्या कापांप्रमाणेच एक पदार्थ होता तोसुद्धा चविष्ट वाटला.

नववीत असताना त्यांनी पहिल्यांदा ‘रुचिरा’ पुस्तकातून वाचून सुरळीच्या वडय़ा तयार केल्या होत्या. आईला न सांगता आई शाळेतून यायच्या आधी तिने उत्तम अशा सुरळीच्या वडय़ा तयार करून ठेवल्या तेव्हा तिचा हातसुद्धा भाजला गेला होता. पण जिद्दीने तिने त्या पूर्ण केल्या. हा गुण तिच्या आईचा असावा…

लहानपणी तिची इच्छा होती ती म्हणजे तिला डोश्याची गाडी काढायची होती. याचं कारण तिच्या घराजवळ शीव सर्कलला एक डोश्याची गाडी उभी राहायची. त्यातला डोसा अश्विनीला फार आवडायचा आणि तो डोसा कसा करतो, कसा फिरवतो हे बघण्यात तिने एक-एक तास घालवला आहे. तेव्हाच तिने ही डोश्याची गाडी काढण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यांचा उपयोग तिला आता झाला. जेव्हा डाएटमुळे तिच्या मुलाला गहू, ज्वारी खायची नव्हती तर स्वतः त्याला तिने डोसा बनवून दिले. तेव्हापासून तिला मुलं ‘बेस्ट डोसा मेकर मॉम’ असे म्हणतात. तिला आवडणाऱया रेस्टॉरंटची भली मोठी यादी तिने माझ्यासमोर मांडली. त्यामध्ये डोसा गाडीवाल्यापासून गुरुकृपा ते गजालीपर्यंतची नावे होती. गप्पा मारता मारता तीन तास कसे संपले कळलेच नाही. खाण्याच्या विषयी अजून काही बोलायचं झालं तर तिच्याकडे भरपूर काही होतं, पण वेळेअभावी आम्हाला ही मुलाखत इथेच संपवावी लागली व अश्विनीसोबतची लंच डेट डीनरबरोबर संपली.

देव खीर
साहित्य – 1 वाटी दूध , 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी मैदा ,1 वाटी कणिक, चवीनुसार मीठ , चवीनुसार साखर, 1 चमचा वेलची पावडर, 4 चमचे बदाम-पिस्त्याचे काप.
कृती – सर्वप्रथम दूध उकळत ठेवा. नंतर तांदळाची पिठी, कणिक व मैद्यात थोडे मीठ घालून त्याचा गोळा करून पातळ पोळी लाटा. त्याचे मोठे तुकडे कापून ते दुधात घालून उकळवा. दूध थोडे घट्ट झाल्यावर चवीनुसार साखर घाला. नंतर बदाम-पिस्त्याचे काप व वाटल्याचा थोडे केशर घालून दूधाला थंड करा.

वांग्याचं भरीत
साहित्य – 1 नग मोठं वांग , 4 ते 5 नग लवंगा, 1 चमचा बारीक कापलेला लसूण, 1 चमचा बारीक कापलेली मिरची, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा बारीक कोथिंबीर, 2 नग टोमॅटो, 2 चमचे तेल, 1 नग कांदा.
कृती – वांग्याला लवंगा टोचून घेणे. त्या आत जातील याची काळजी घेणे. असे तयार झालेले वांगे गॅसवर किंवा कोळशाच्या शेगडीवर भाजून घेणे. टोमॅटो, कांदेही भाजून घेणे. वांग्याची साल काढून त्याला कुस्करून घेणे. त्यातच भाजलेला कांदा, टोमॅटो कुस्करणे, मोहरी आणि लसणाची फोडणी घालणे, पोळी किंवा भाकरीसोबत खायला देणे.

मसाला डोसा
साहित्य – 1 वाटी तांदूळ, 1वाटी उडदाची डाळ , 1 चमचा मेथीदाणे , 1 वाटी डोसा मसाला , 2 चमचे हिरवी चटणी (हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट)
कृती – सर्वप्रथम तांदूळ, डाळ, मेथीदाणा एकत्र भिजवून 4 तास ठेवा. नंतर त्याला बारीक दळून 5 ते 6 तास फरमेंट करा. नंतर मिश्रण तव्यावर वाटीने पसरवून थोडे शिजू द्या (कुक करा). नंतर डोश्याचा मसाला घालून थोडे तेल सोडून कडक झाल्यावर रोल करून हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या