अन्न हे पूर्णब्रह्म

773

>> मीना आंबेरकर

आपल्या स्वयंपाकघरातच आपल्या आरोग्याचे केंद्र आहे. डाळी, भाज्या, फळं, धान्ये, कडधान्ये समस्यातून आपल्या शरीराचे पोषण होते.

आरोग्य राखायचे असेल तर समतोल आहाराबरोबर खाण्यापिण्याच्या संबंधित इतर गोष्टींकडेही लक्ष पुरविले पाहिजे. उदा. खाण्याच्या वेळा ठरावीक असाव्यात. खाण्याच्या वेळा न सांभाळल्यास त्याचा पचनावर परिणाम होतो. एखादा पदार्थ चांगला लागतो म्हणून भरपूर प्रमाणात खाणे, चहा हे केवळ पेय आहे असे समजून अनेक वेळा चहा पिणे यानेही पचनक्रिया बिघडते. रस्त्यावरचे उघडे अन्न खाणे यामुळे अनेक रोगांना निमंत्रण दिल्यासारखे होते. त्याचप्रमाणे भाज्या, फळे, धान्ये खाण्यापूर्वी स्वच्छ धुणे महत्त्वाचे ठरते. शाकाहारी आहारात धान्ये, डाळी, दाणे, तेल, भाज्या, फळे यांचा समावेश आहे. हे प्रकार आलटून पालटून वापरावेत, म्हणजे रुचिपालट होतो व निरनिराळय़ा अन्नात जे थोडेफार फरक असतात त्याचा फायदा शरीराला मिळतो.

वेगवेगळय़ा धान्यांचा व डाळींचा उपयोग स्वयंपाकात करावा. शक्य असेल तेव्हा कोंडायुक्त धान्याचा वापर करावा. कारण कोंडय़ामध्ये पुष्कळ जीवनसत्त्वे असतात. शक्यतो बाजारी गव्हाच्या पिठाचा वापर करू नये. कारण त्यात गव्हाचा कोंडा नसतो. आहारात मैद्याचा वापर कमीत कमी करावा. कारण त्यात पोषणमूल्ये कमी असतात. तूर, मूग, हरभरा, मसूर वगैरे डाळी आलटून पालटून वापराव्यात. तसेच वेगवेगळय़ा कडधान्यांचा समावेश आहारात योग्य प्रमाणात असावा. मांसाहारी आहारातही काही वेळा डाळींचा वापर करणे योग्य ठरेल.

तेल धान्यांचा वापर आहारात असणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे आहारातील प्रथिनांची उणीव भरून निघते. भुईमूग, तीळ ही महत्त्वाची तेलधान्ये आहारात प्रथिनांची कमतरता जाणवू देत नाहीत. तसेच तेल, तुपाचा वापर योग्य प्रमाणात आहारात करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे शरीराची उष्णता कायम राहते. शरीरातील सांध्यांना वंगण पुरवले जाते. स्निग्ध पदार्थांच्या वापराने आतडय़ाचा दाह कमी होतो.

गूळ पापडी –
साहित्य – जाडसर कणिक 1 वाटी, गूळ किसून पाव वाटी, तूप पाव कप, खसखस 2 टे. स्पून.
कृती – कढईत पाव कप तुपावर कणिक मंद विस्तवावर भाजून घ्यावी. नंतर पीठ बाजूला काढून घ्यावे. पुन्हा थोडय़ा तुपात खसखस भाजून घ्यावी. भाजलेली खसखस कणकेत मिसळावी. गुळाचा कीस कणकेत मिसळून घ्यावा. मिश्रण हलकेच गरम करून एकजीव करावे व तुपाच्या थाळीत थापावे. गरम असतानाच वडय़ा पाडाव्यात.

मटारच्या करंज्या –
साहित्य – 2 वाटय़ा गव्हाचे पीठ, अर्धी वाटी मैदा, मीठ, 4 चमचे कॉर्नफ्लोअर, 3 वाटय़ा सोललेला वाटाणा, 5-6 हिरव्या मिरच्या, पाव वाटी खवलेला नारळ, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा साखर, 1 चमचा लिंबाचा रस, तळण्यासाठी तेल, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 4 चमचे तेल फोडणीसाठी, 4 चमचे तेल मोहनासाठी, अर्धा चमचा गरम मसाला.

कृती – मटार मिक्सरमधून जाडसर काढावा. मिरच्या जाडसर वाटून घ्याव्यात. पातेल्यात 4 चमचे तेल घालून मध्यम आचेवर तेल गरम करावे. त्यात कांदा टाकावा. कांदा गुलाबीसर झाल्यावर आले-लसूण पेस्ट टाकून 2 मिनिटे परतावे. मटार टाकावा. त्यात मीठ, साखर टाकून 3-4 मिनिटे परतावे. लिंबू पिळावे. गव्हाचे पीठ, मैदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ एकत्र करून 4 चमचे मोहन घालावे. पीठ घट्ट भिजवावे. पुऱयाप्रमाणे लाटय़ा घ्याव्यात. पुऱया लाटून त्यात मटारचे सारण भरावे. कड ओलसर करून बंद करावी. करंजी फिरकी कडेने फिरवावी. मध्यम आचेवर करंज्या तेलात तळाव्यात. गरमागरम करंज्या हिरव्या चटणीसोबत खाव्यात.

घेवडय़ाची भाजी –
साहित्य – घेवडय़ाच्या शेंगा, ओले खोबरे, लाल तिखट, मीठ, हळद, धण्या-जिऱयाची पूड, 4 चमचे गोडा मसाला, 2 चमचे तेल, अंदाजाने दाण्याचा कूट, गूळ, भाजी शिजण्यापुरते दूध.
कृती – घेवडय़ाच्या शेंगा दोरा काढून मोडून घ्याव्यात. स्वच्छ धुऊन आवश्यक तेलात फोडणीस टाकाव्यात. त्यात मीठ, धणे-जिरे पावडर व गोडा मसाला घालून शिजण्यासाठी अंदाजाने दूध घालावे. भाजी शिजत आली की, चवीनुसार गूळ, आले, खोबरे, शेंगदाणा कूट घालून व्यवस्थित ढवळून पूर्ण शिजू द्यावी.

कानमंत्र –
भाज्या शिजवताना शक्यतो लोखंडी भांडय़ात शिजवाव्यात. लोह हे खनिज आपोआप मिळते.
बटाटे उकडताना त्यात दोन-तीन चमचे दूध घालावे, बटाटे फुटत नाहीत.
भेंडीची भाजी करताना कढईला चिकटते म्हणून फोडणीत थोडी साखर घालावी.
कढिलिंबाची पाने तेलात तळून ठेवावीत. त्याचा स्वादही चांगला येतो व जास्त दिवस टिकतात.

आपली प्रतिक्रिया द्या