
सामना ऑनलाईन । मुंबई
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणात उतरणार्या उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोत, उत्पन्नाचे साधन, देणग्या आदींचा प्रत्यक्ष तपशील सादर करावा लागणार आहे. केवळ शपथपत्र सादर न करता प्रत्यक्ष माहिती सादर करावी लागेल. भविष्यात होणार्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही याच पद्धतीने उमेदवारी अर्ज सादर करावे लागतील.
महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांना शपथपत्र सादर करावे लागते. या शपथपत्रात प्रामुख्याने मालमत्ता व दायित्व, शैक्षणिक पात्रता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयक माहिती नमूद करावी लागते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शपथपत्रात आता नवे बदल केले आहेत. उमेदवाराच्या स्वतःच्या व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आणि त्याबाबतचे मागील तीन वर्षांचे तपशील सादर करावे लागतील. त्यात शेती, नोकरी, व्यापार व्यवसाय, भांडवली नफा, बक्षिसे, देणग्या व इतर उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था इत्यादींसोबतच्या करारांचीदेखील माहिती द्यावी लागेल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
थकीत रकमेचा गोषवारा
उमेदवाराने यापूर्वी निवडणूक लढवली असल्यास त्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या माहितीचा गोषवारादेखील शपथपत्रात नमूद करणे आवश्यक राहील. त्यात यापूर्वी लढवलेल्या निवडणुकीचे नाव, निवडणुकीचे वर्ष, त्यावेळी जाहीर केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचे मूल्य, दायित्वे, थकीत रकमांचा गोषवारा इत्यादींचा समावेश केला आहे.
निवडून आल्यावर काय करणार
निवडून आल्यावर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राच्या विकासासाठी करणार असलेल्या उपाययोजनांचीही माहिती जास्तीत जास्त 500 शब्दांत नमूद करावी लागेल. आता यापुढे होणार्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये हा बदल लागू होईल, असेही ते म्हणाले.



























































