परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठास पसंती

मुंबई विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांना परदेशी विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दर्शवली आहे. मानसशास्र, अर्थशास्त्र, इंग्रजी, वाणिज्य, समाजशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, भौतिकशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता आणि भाषाशास्त्र अशा विषयांना या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यात जपान, पॅलेस्टाईन, फिजी, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, मॉरिशस, युगांडा, लिसोथासह 14 देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील सर्व विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. पदवी अभ्यासक्रमांसाठीही परदेशी विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांत बी.ए., बी.कॉम., बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), बी.ए. एमएमसी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी हे विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. हिंदुस्थानी सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) माध्यमातून पहिल्यांदाच सर्वाधिक परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश मुंबई विद्यापीठात झाले आहेत. आयसीसीआरच्या विविध योजना अंतर्गत पूर्णपणे अनुदानित शिष्यवृत्तीवर हे विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.

आयसीसीआरच्या व्यतिरिक्त अनिवासी हिंदुस्थानी, हिंदुस्थानी वंशाची व्यक्ती आणि हिंदुस्थानचे परदेशी नागरिकत्व या वर्गवारीतूनही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यातील बहुतांश 60हून अधिक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांत पदवीच्या पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह राहायला उपलब्ध झाल्यामुळे नजीकच्या काळात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढेल असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.