वनविभागाचा बेजबाबदारपणा, अखेर कमलापूर कॅम्पमधील हत्तीने प्राण सोडला!

232

गडचिरोलीच्या सिरोंचा वनविभागांतर्गत असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील चार वर्षाच्या आदित्य हत्तीचा अखेर सोमवारी मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बऱ्याच दिवसा पासून अन्नपाणी सोडले होते. तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱयांना उपचारासाठी न बोलविता गेल्या दहा दिवसांपासून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून उपचार केल्याने वनविभागाचा बेजबाबदारपणा हत्तीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याची टीका वन्यजीव प्रेमींकडून होत आहे.

आदित्य हा 11 जूनला हत्तीकॅम्प परिसरातील तलावाच्या चिखलात अडकला होता. त्याला बाहेर काढण्यात आल्यानंतर तेव्हापासून तो अशक्त झाल्याने वनविभागाने त्याच्यावर उपचार सुरू केले होते. कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये एकूण 10 हत्ती होते. मात्र, या हत्तीची देखरेख करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नाही. हत्तीवर उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांना पाचारण न करता स्थानिक डॉक्टरांकडूनच उपचार सुरू होते.

सोमवारी सकाळी केवळ चार वर्षाच्या आदित्य हत्तीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी महेश गुंडेट्टीवार यांनी केली आहे. आतातरी वनविभाग येथील माहुतांची रिक्तपदे भरणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या