सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ वादात, वन विभागाच्या परस्पर कारभाराचा 550 हून गावांना बसणार फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिकेच्या नियोजनात स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता वन विभागाने परस्पर निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. काही वाघही यामध्ये सोडण्यात आले आहेत, तर आणखी वाघ सोडण्यात येणार आहेत. सध्या यातील वाघांकडून गवा, रेडय़ांची शिकार केली जात आहे. वाघांना भक्ष्य मिळावे, यासाठी शेकडो हरणे, चितळ आदी प्राणी सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यांतील 550हून अधिक गावांवर निर्बंध येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वाघांची संख्या वाढल्यास आधीच वन्यप्राण्यांच्या त्रासाने त्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडणार आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोके पाहाता लोकप्रतिनिधींसह जनतेतून या प्रकल्पाला विरोध होऊ लागला आहे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या या कॉरिडॉरसंदर्भात विशेष बैठक झाली. जिल्हाधिकारी विजय राठोड, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कोल्हापूर श्रीलक्ष्मी अन्नाबथुला, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, क्षेत्रीय संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तुषार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव व इतर संबंधित अधिकारी प्रत्यक्ष, तर आमदार विनय कोरे, आमदार शिवाजी पाटील, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, कोयना वन्यजीव विभागाचे उपसंचालक आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते. व्याघ्र प्रकल्पांतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिकेच्या (कॉरिडॉर) नियोजनात स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याचा प्रकार अन्यायकारक असून, या नवीन सीमांकनामुळे स्थानिकांच्या विकासावर गदा येणार आहे. दोन वर्षांपूर्वी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, वन्यजीव विभागाच्या प्रस्तावित कॉरिडॉरबाबत स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधींचे म्हणणे वन विभाग तसेच सरकारच्या संबंधित मंत्रालयाला कळविण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी दिल्या. तसेच हा प्रस्ताव मान्य नसल्याबाबतही मुख्यमंत्री तसेच वनमंत्री यांच्याकडेही आम्ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातील 550हून अधिक गावांवर निर्बंध येण्याची शक्यता असून, आधीच वन्यप्राण्यांच्या त्रासाने त्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडणार असल्याचेही आबिटकर यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले, प्रकल्प राबविताना पारदर्शकता महत्त्वाची असून, निर्बंधांची पूर्वकल्पना न देता निर्णय घेणे लोकशाहीला धरून नाही. अनेक वर्षांपासून या दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन आधीच संघर्षाचे असून, नवीन कॉरिडॉरमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि मूलभूत अधिकारांवर कडक निर्बंध लादले जातील, असे ते म्हणाले.

यावेळी खासदार शाहू छत्रपती यांनी नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. खासदार धैर्यशील माने यांनी या प्रकल्पाचा तांत्रिक आराखडा व भौगोलिक व्याप्ती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिकांचा रोष लक्षात घेता, प्रशासनाने केवळ आराखडे न बनवता प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थितीचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली. विकास प्रक्रियेत स्थानिकांचा सहभाग अनिवार्य असून, त्यांच्या विरोधात जाणारा कोणताही निर्णय लादला जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार विनय कोरे यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन सीमांकनाबाबत ठराव घेऊन संबंधित विभागाकडे देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर आमदार शिवाजी पाटील यांनी या प्रकल्पाची माहिती गुप्त ठेवल्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे.