
झी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘दार उघड बये’ या मालिकेत मुक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे सानिया चौधरी. सानियाला भूमिकेसाठी नव्या गोष्टी शिकण्याची आवड आहे. आव्हानांवर मात देण्याची जिद्द तिच्यात आहे… एक प्रॉमिसिंग चेहरा.
सानिया चौधरीची जडणघडण पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणात झाली. ती एकत्र कुटुंबपद्धतीत वाढली. लहानपणापासून सानियाला नृत्याची आवड होती. तिने कथ्थक नृत्यकलेत मास्टर्स केले आहे आणि तिच्या गुरू अस्मिता ठाकूर आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत शिकत असताना पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक अशा सर्व स्पर्धांमध्ये तिचा कायम सहभाग होता. काही सौंदर्य स्पर्धांमध्येसुद्धा तिचा सहभाग होता आणि त्यातील ‘मिस पुणे फेस्टिव्हल’मधील सौंदर्य स्पर्धेत तिने ’बेस्ट स्माईल’ साठी पुरस्कार जिंकला होता. अभिनयाच्या काही कार्यशाळादेखील तिने केल्या. ‘तमन्ना’ या हिंदी नाटकात तिची मध्यवर्ती भूमिका असून हे नाटक ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जनजागृती करणारे होते. ‘त्या रात्री’ या मराठी प्रायोगिक नाटकातही तिने काम केले होते. झी युवा वरील ‘साजणा’ ही तिची पहिली मालिका होती. तिच्या चेहऱयाला ओळख मिळाली ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सांग तू आहेस का’ या रहस्यमय मालिकेतील ‘वैभवी’ या भूमिकेने तिला एक नवी ओळख मिळाली. ही मालिका संपल्यावर सानिया एका चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत होती आणि ती संधी तिला मिळाली झी मराठीच्या ‘दार उघड बये’ या मालिकेमुळे. सानिया म्हणते, लहानपणापासून मी ‘झी मराठी’ वाहिनी बघत मोठी झाले आहे. या वाहिनीसाठी एका तरी मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मला मिळावी, असे माझे स्वप्न होते आणि ती माझी इच्छा ‘दार उघड बये’ या मालिकेमुळे पूर्ण होत आहे.’ भूमिकेसाठी नव्या गोष्टी शिकण्याची आवड असणारी सानिया या मालिकेमुळे तिची एक वेगळी ओळख निश्चित निर्माण करेल.
मालिकेत सानिया गरीब घरात वाढलेली ‘मुक्ता’ ही व्यक्तिरेखा साकारतेय. तिचे वडील तिला संबळाचे धडे देतात, पण समाजाचा मुक्ताच्या एका स्त्र्ााrच्या संबळ वादनाला विरोध होतो. मग अशा वेळी मुक्ता धाडसाने या सगळ्याला कशी सामोरी जाते, हे मालिकेत पाहता येईल. ‘मी नृत्य शिकलेले असल्याने मला ताल आणि लय या गोष्टी समजत होत्या. त्यामुळे संबळ शिकणे सोपे गेले तरी संबळ वाजवताना जी देहबोली असते आणि संबळ वाजवताना बेधुंदपणे त्यात तल्लीन होणे, हे सादर करणे मला आव्हानात्मक वाटले.’ असे ती सांगते.
गणेश आचवल


























































