शेख हसीना यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बुधवारी जोरदार झटका बसला. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण (आयसीटी) ने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण-1 चे अध्यक्ष न्यायाधीश मोहम्मद गुलाम मुर्तुजा मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठाने हा निकाल दिला. या निकालात न्यायाधीकरणाने शकील अकंद बुलबुल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. शेख हसीना आणि शकील बुलबुल यांच्यातील फोन संभाषणाची चौकशी केल्यानंतर आयटीसीने त्यांना शिक्षा सुनावली आहे. या दोघांतील संभाषण गेल्या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या कथित ऑडियो क्लिपमध्ये शेख हसीना म्हणाल्या होत्या की, त्यांच्याविरुद्ध 227 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना 227 लोकांना मारण्याचा परवाना मिळाला आहे. शेख हसीना यांची ऑडियो क्लिपमधील विधाने अतिशय गंभीर असून हे विधान म्हणजे न्यायालयाचा अवमान करण्याचा आणि न्यायाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणारे आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे.