राहुल गांधींना माजी निवडणूक आयुक्तांचा पाठिंबा, निवडणूक आयोगाला दिला मोलाचा सल्ला

लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होऊन ‘मतचोरी’ झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. बोगस मतदारांच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांना आता माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांचेही समर्थन मिळाले आहे. बोगस मतदारांबाबत केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाने स्वतःहून चौकशी करावी, असे मत ओ.पी. रावत यांनी व्यक्त केले आहे.

राहुल गांधी यांनी गुरुवारी दावा केला की, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बेंगलोर सेंट्रल मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात एक लाखाहून अधिक बोगस मतदार होते. त्यांनी मतदार यादीतील काही त्रुटी दाखवत, एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नोंदणी, चुकीचे पत्ते आणि एका खोलीत 80 मतदारांचे नोंदणी झाल्याचा आरोप केला.

यावरच ओ.पी. रावत यांनी ‘द टेलीग्राफ’शी बोलताना सांगितले की, “जेव्हा मी आयुक्त होतो, तेव्हा कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने आरोप केल्यास तात्काळ चौकशी केली जायची आणि सामान्य माणसासमोर तथ्ये सादर केले जात होते. जेणेकरून व्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहील. आम्ही त्यांना (पक्षांना) आधी तक्रार करण्यास सांगितले नाही.”