
अंमलबजावणी संचालनालयाकडून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापाठोपाठ आज राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदविण्यात आला. सीताराम कुंटे हे सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले. महाराष्ट्र पोलीस आस्थापनेवर झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपप्रकरणी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी साडेसहा तासांपेक्षा अधिक वेळ ईडीने घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात झालेल्या पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या व नियुक्त्यांप्रकरणी नोंदविण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. त्यावेळी सीताराम कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. याप्रकरणी ईडीकडून कुंटे यांना दोन वेळा समन्सही बजावले होते, मात्र ते ईडीसमोर हजर राहू शकले नव्हते. याआधी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे.
फोन टॅपिंग अहवालाबाबतही चौकशी
ईडीकडून तत्कालीन राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या गोपनीय अहवालाच्या आधारे पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये गुंतलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येत आहे. या अहवालात फोन टॅपिंगदेखील जोडले गेले होते. रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना अहवाल सादर केला. त्यानंतर जयस्वाल यांनी हा अहवाल गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव कुंटे यांच्याकडे पाठवला. या अहवालाबाबतही चौकशी झाल्याचे ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.































































