
सामना प्रतिनिधी । कराड
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी 5 कोटी 15 लक्ष निधी मंजूर झाला असून याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपचे डॉ. अतुल भोसले करीत असल्याचा आरोप कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भाजपाचे डॉ. अतुल भोसले म्हणजे सर्वपक्षीय फिरून आलेले नेते आहेत. राज्य शासनाकडून मंजूर विकास निधीचे अध्यादेश प्रसिद्ध झाले की, ते तात्काळ मिळवून हे काम मी केले असे कराड दक्षिण मतदार संघात बॅनर लावून गैरसमज पसरवित आहेत असा आरोपही मनोहर शिंदे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले या दोघांमध्ये विकासकामांच्या निधीवरून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात श्रेयवादाचे राजकारण रंगू लागले आहे. शासन निर्णय पारित झाल्यानंतर सर्वप्रथम डॉ. अतुल भोसले प्रसारमाध्यमांना विकास निधीची माहिती देत आहेत. दरम्यान यानंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते सदरचा निधी आमच्या नेत्यांनी आणला आहे असे ठासून सांगत आहेत.





























































