
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे एकेकाळचे आक्रमक सलामीवीर म्हणून ओळखले जाणारे माजी क्रिकेटपटू व्ही. बी. चंद्रशेखर यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. चेन्नई येथील त्यांच्या राहत्या घरात ते मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई येथील घरातील त्यांच्या खोलीत ते मृतावस्थेत आढळले. गुरुवारी सायंकाळी 5.45 वाजता ते त्यांच्या खोलीत गेले होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पत्नी सौम्या यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला परंतु आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी खोलीच्या खिडकीतून आत पाहिलं, तेव्हा चंद्रशेखर यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. त्यामुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही काळापासून ते आर्थिक तणावाचा सामना करत होते. चंद्रशेखर हे तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये ‘व्हीबी कांची वीरन्स’ नावाच्या संघाचे मालक होते आणि याच संघाच्या मालकीमुळे ते आर्थिक तणावात होते. त्यांच्या मृत्युमुळे क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. अनिल कुंबळे, हरभजन सिंग, सुरैश रैनासह क्रिकेट जगतातल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आयपीएलमधील आजवरचा सर्वाधिक यशस्वी संघ म्हटल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्ज या संघात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आणण्याचं श्रेयही चंद्रशेखर यांना जातं. 2008मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या वर्षात ते सीएसके संघाचे ऑपरेशन डायरेक्टर होते. तेव्हाच त्यांनी संघात तगड्या खेळाडूंचा भरणा करत आपल्या अनुभवाची चुणूक दाखवली होती.
81 सामन्यात 4999 धावा, सर्वात जलद शतकाचा 31 वर्षांचा विक्रम
1988मध्ये चंद्रशेखर यांनी न्यूझीलँडविरुद्ध सामन्यापासून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. चंद्रशेखर यांनी आपल्या कारकिर्दीत प्रथम वर्ग क्रिकेटचे 81 सामने खेळले आणि 43.09 इतक्या धावगतीने 4999 धावा केल्या. यात दहा शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.
अतिशय आक्रमक शैलीत ते सलामीला उतरत असत. त्यांनी 1988-89च्या रणजी मालिकांमध्ये क्रिस श्रीकांत यांचा विक्रम मोडीत काढत फक्त 56 चेंडुंत शतक पूर्ण करण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. जवळपास 31 वर्षं तो विक्रम अबाधित होते. 2016मध्ये ऋषभ पंतने 48 चेंडुंमध्ये शतक पूर्ण करून त्यांचा विक्रम मोडला होता.





























































