मतदार यादीतून माजी निवडणूक आयुक्तांचे नाव गायब; अनेकांच्या नावात गडबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गाझीयाबादमधील मतदारयादीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचे मंगळवारी उघड झाले आहे. माजी निवडणूक आयुक्त जीवीजी कृष्णमूर्ति यांचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. कृष्णमूर्ती कौशांबीमधील मलयगिरी टॉवरमध्ये 27 वर्षांपासून राहत आहेत. तरीही यादीतून त्यांचे नाव गायब कसे झाले असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कौशांबी परिसरातील सुमारे 60 टक्के नागरिकांचे नाव मतदार यादीतून गायब आहे किंवा नावात गडबड असल्याचे नागरिकांनी सांगितले. या परिसरातील 5400 मतदारांच्या नावात गडबड असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

गेल्या आठ वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीपूर्वी माजी निवडणूक आयुक्त कृष्णमूर्ती यांचे नाव मतदार यादीतून गायब केलेले असते. याबाबतची तक्रार दिल्यानंतर ते यादीत समाविष्ट करण्यात येते. मात्र, पुढील निवडणुकीत पुन्हा त्यांचे नाव वगळण्यात येते. यंदाही त्यांनी मतदार यादीतून नाव गायब असल्याची तक्रार नोंदवली आहे. मात्र, निवडणुकीला कमी कालावधी शिल्लक असल्याने त्यांचे नाव यादीत टाकणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच या भागातील मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे त्यात काही बदल होण्याची शक्यता कमी आहे.

कौशांबीतील 60 टक्के मतदारांची नावे मतदार यादीतून गायब आहेत किंवा त्यांच्या नावात चुका करण्यात आल्या आहेत. कौशांबीमध्ये 9800 मतदार आहेत. त्यातील 5400 मतदारांची नावे गायब आहेत किंवा त्यात गडबड करण्यात आली आहे. मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर ही गडबड उघडकीस आली आहे. परिसरातील नागरिकांनी निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबतची माहिती त्यांना दिली. मतदारयादीत झालेल्या या गडबडीमुळे नागरिक नाराज आहेत. प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र असंतोष आहे.